श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ दिनांक 8-1-1986 (सभार)
श्री संताजी महाराज जगनाडे सुवर्ण महोत्सवातील प्रास्ताविक भाषण टी. आर. दारूणकर कारभारी तिळवण तेली समाज विश्वस्त, नगर
बंधू आणि भगिनींनो!
आजचा दिवस हा सोन्याचा दिवस मानला पाहिजे. कारण श्री. संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्सव नगर मध्ये इ. स. १९३६ पासून साजरा होत आहे. आज मार्गशीर्ष वद्य १३ ला म्हणजे ८ जानेवारी १९८६ ला पन्नास वर्षे होत आहे. म्हणून आपण सुवर्ण महोत्सव साजरा करीत आहोत.
गेली ४९ वर्षे आपले वृद्ध समाज बांधव हा पुण्यतिथी सोहळा साजरा करीत आले आहेत. या उत्सवाला कारणीभूत झालेली पार्श्वभूमी अशी आहे. सन १९२३ पर्यंत मुंबईमध्ये तेली समाजातर्फ ताई तेलीणीचा उत्सव फार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक रित्या साजरा होत असे. त्यावेळी तेथे विद्वान मंडळीची भाषणे होत असत. अशाच एका भाषणाच्या वेळी श्री. अच्युतराव कोल्हटकर यांनी म्हटले की, तेली समाजाने अशा प्रकारच्या सामाजिक स्वरूपाच्या सार्वजनिक उत्सवाकरिता अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्ति अधिक योग्य होतील. अशा प्रकारची सूचना केली, त्यांच्या भाषणाचा समाज बांधवावर चांगलाच परिणाम झाला.
१९२३ मध्ये मुंबईतील काही समाज बांधवांवर भाषणाचा चांगलाच परिणाम होऊन व स्मरण होऊन श्री. संताजी जगनाडे महाराज हे आपल्या समाजात होऊन गेलेले व श्री. संत तुकाराम महाराजांच्या सानिध्यात राहुन त्यांच्या अभंगाचे लिखाण करणारे एक थोर संत आहेत हे चित्र त्यांनी समाजापुढे ठेवले व तेव्हापासून मुंबई व सुदुंबरे येथे समाजातर्फे संताजीचा पुण्यतिथी उत्सव दरवर्षी साजरा होऊ लागला. हवे असलेले वातावरण तयार होत गले. त्यामागे मुंबई-पुणे सुदुंबरे येथे मंडळाची स्थापना होऊन कार्यक्रम ताई तेलणी पासून श्री. संताजी महाराजांकडे समाजाला नेण्याची सिद्धता झाली.
अशा प्रकारे हा उत्सव सन १९३६ मध्ये नगर येथे सुरु झाला. थोड्या फार प्रमाणाने सप्ताहात भजन, कीर्तनेही होत असे व मार्गशीर्ष वद्य १३ स पालखींची शहरातून मिरवणक व भंडारा देखील -सुरू झाला. त्यावेळी खर्च फार कमी प्रमाणात होत असे (दिवसमानानुसार) काही वेळा तर वर्गणी रुपाने व वस्तु रूपाने हा कार्यक्रम व भंडारा करण्यात आला. त्यावेळचे वृद्ध समाज बाधव संघटीत राहुन कार्यक्रमास शोभा आणीत. त्यावेळच वृद्ध समाज बांधव पुढीलप्रमाणे
१) नारायण सावळेराम दारुणकर (कारभारी)
२) गोविंद सावळेराम दारुणकर,
३) रघुनाथ सावळेराम दारुणकर
४) बाबुराव सदोबा देवकर
५) नारायण सदू शिन्दे
६) काशिनाथ भिवसेन इंगळे
७) रामचंद्र भाऊ लोखंडे
८) मल्हारी गोपाळा काळे
९) रामभाऊ भाऊ हजारे
१०) हरिभाऊ लक्ष्मण जाधव (बेलापूरकर)
११) हरिभाऊ भाऊ देवकर
१२) नामदेव विठोबा क्षिरसागर (सावकार)
१३) पंढरीनाथ महादू करपे (राहरकर)
१४) मारुती वडगांवकर
१५) सहादू कोटकर (हळदे)
१६) किसनराव ढगळे (सावकार)
१७) नामदेव भिकुजा म्हसके
१८) बाबूराव किसन इंगळे
१९) काशिनाथ निवृत्ती पतके
२०) गणपतराव काळे (वाळकीकर)
वरील सर्व मंडळींनी समाज सेवा अतिशय उत्तम प्रकारे केली. नंतर १९५० मध्ये ट्रस्ट अॅक्ट कायदा चालू झाला व १९५२ पासून तो आज पावेतो ट्रस्टी (विश्वस्त) हा उत्सव चांगल्या प्रकारे करू लागले.
पूर्वी तेलीखुंट येथे समाजाचे जागेत हा उत्सव साजरा होत असे आता १९६९ पासून डाळमंडई येथे समाजाचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिगत साजरा होत आहे.
अशा प्रकारे हा उत्सव सुरु होऊन ४९ वर्षे झालेली आहेत. आज तो ५० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यासाठी समाजातील वयोवृद्ध व सामाजिक, राजकीय कार्यकर्त्याचा कार्याचा गौरव प्रित्यर्थ व ज्या वृद्ध माता-पित्यांचे वयास ८० वर्षे होऊन गेली आहेत. त्यांच्या गौरवार्थ हा समारंभ होत आहे. या निमित्ताने या लोकांना चांदीची मुद्रिका, श्रीफळ व पुष्प हार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
नगर शहरातील तेलीखंट या चौकाला श्री संताजी जगनाडे चौक तेलीखुंट) हे नामकरण नगर पालिकेकडून ठरावाने करण्यात आले. तसेच अमरधाम येथे नगरपालिकेकडून १५ बाय १२ची जागा निरंतर कराराने १ रु. नाममात्र वार्षिक भाड्याने श्री संताजी जगनाडे सह श्री संत तुकाराम महाराज यांचे ''वैकुंठगमन" या मूर्ती बसविण्यासाठी नगर पालीकेने जागा दिली याबद्दल समाज त्यांचे आभारी आहे. श्री संताजीचे चिरंतन स्मरण म्हणून समाजाने हे फार मोठे कार्य केले आहे.
या कार्यक्रमासाठी आपण सर्व समाज बांधव सर्व तालुक्यातून या ठिकाणी उपस्थित राहन शोभा आणली याबद्दल विश्वस्त आपले ऋणी असून आभार मानीत आहे.
इथून पुढे समाजाने संघटीत, एकत्र राहुन समाजाची किर्ती, प्रगती उंचावेल असे कार्य करून अशीही उज्वल परंपरा अखंड जतन करावी हीच अपेक्षा !
जय संताजी !
(कारभारी)
त्र्य. र. दारूणकर