घोडेगाव : कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या पलंग उत्सवाला घोडेगाव (ता. आंबेगाव) येथे सुरवात झाली. पलंगाच्या दर्शनासाठी नागरिक येऊ लागले आहेत.
हा पलंग येथे १० दिवस असतो. तुळजापूरच्या भवानी मातेच्या पलंगाची मिरवणूक तुळजापुरात झाल्यानंतर शिलंगणानंतर मातेची मूर्ती पलंगावर विराजमान केली जाते. विजयादशमी ते कोजागरी पौर्णिमा या काळात तुळजाभवानी माता या पलंगावर विश्रांती घेते. याच पलंगाचा उत्सव सध्या घोडेगावात सुरू आहे. या पलंगाची बांधणी करण्याचा मान येथील तिळवण तेली समाजाचे पुजारी बाबूराव अंबादास पलंगे, अनंत बाबूराव पलंगे, गणेश पलंगे, उमेश पलंगे करत आहेत. घोडेगाव येथील ठाकूर घराणे या पलंगाची कलाकुसर करतात. अरुण भागवत हे पलंग जोडण्याचे काम करतात. या पलंगाचे वास्तव्य श्री शनैश्वर मंदिरात असते. हा पलंग श्रावण वद्य सप्तमीपासून भाद्रपद शुद्ध पंचमीपर्यंत घोडेगावात असतो. या काळात भाविक पलंगाचे दर्शन घेतात. या १० दिवसांच्या वास्तव्यात तुळजाभवानी पलंग उत्सव समिती, ग्रामस्थ, तिळवण तेली समाज यांच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाद्रपद शुद्ध पंचमीला घोडेगावातून पलंगाची मिरवणूक काढली जाते. त्यानंतर पलंग निमदरी, जुन्नर, कुमशेत, नारायणगाव, पारनेर, अळकुटी, नगर, जामखेडमार्गे विजयादशमीच्या दिवशी तुळजापुरात दाखल होतो.