लेखक: अर्जुनराव भगत (बुर्हाणनगर), श्री संताजी महाराज जगनाडे पुण्यतिथी सुवर्ण महोत्सव स्मरणिका व समाज - बांधव परिचय सन 1936-1986 समारंभ, अहमदनगर, दिनांक 8-1-1986 (सभार)
१) क्षेत्र वर्णन
बुर्हाणनगर हे अहमदनगर पासून सुमारे ५ किलोमिटर अंतरावर १००० लोकवस्तीचे लहानसे खेडेगाव आहे. ते अती प्राचीन असून नगर शहराच्या अगोदर लहानसे शहर होते. त्याठिकाणी १९१३ साली श्री. लहानु भिकु भगत (देवकर) यांनी स्वखर्चाने श्री तुळजापूर देवींचे भव्य मंदिर बांधले. ते आजपर्यंत व्यवस्थित आहे. त्याठिकाणी दरवर्षी नवरात्रामध्ये यात्रा भरते. नगर शहर, नगर तालका, भिंगार आणि आसपासचे खेडयातील लोक तेथे दर्शनास येतात.
२) भक्ति कथा
बुर्हाणनगर येथे बुर्हाणबादशहा राज्य करीत असतांना जानकोजी देवकर नावाचा तेली मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करीत होता. तो देविचा परम निस्सीम भक्त होता. तेव्हा त्यात सर्वजण भगत म्हणून ओळखत असत. तेव्हा त्याची सत्व परीक्षेची वेळ आली. देवीने एका रोगाने ग्रासलेल्या बालिकेचे रूप घेऊन गावात हिंडू लागली परंतु तिला कोणीही थारा किंवा सहारा दिला नाही. तिला पहाताच लोक पाच हात दूर होऊ लागले तिच्या पोटात ना अन्न ना पाणी अशा अवस्थेत जानकोजीच्या घराच्या ओट्या वर येऊन बसली. जानकोजी कामावरून दुपारी घरी जेवणाकरिता आला होता. तेव्हा त्याची नजर तिच्यावर पडली. त्याचे मन द्रवले आणि "बाळ तु कोणाची आहेस" म्हणून चौकशी करु लागले. ती बालिका म्हणाली, "मला जगात कोणी नाही. मी अनाथ आहे." तेव्हा जानकोजीने विचार केला की, आपणास मुलबाळ नाही. तर आपणास देवीच्या रुपाने मुल मिळाले. तेव्हा तिला गरम पाण्याने अंघोळ घालून, तिच्या अंगाला जे काही खरुज, नायटे होते त्यास करडीचे तेल लावून त्यावर चुलीतील राख लावली व तिला गरम गरम बाजरीची भाकरी व पेंडभाजी खावू घातली. घरातील चिरगूट पांघरुन लेण्यास दिले. स्वत:ची मुलगी मानून तो तिचे लाड करु लागला कालांतराने मुलीचे रोग खरुज, नायटे बरे होऊन ती स्वरुप दिसू लागली, तेव्हा ती जानकुजीला म्हणाली की, बाबा आपण तेली असून घाणा का चालवित नाही ? (तेव्हा बालिकारुपी देवीला जानकोजी अंबिका म्हणून हाक मारोत असे,) तेव्हा जानकोजी म्हणाले, आपल्याजवळ भांडवल नाही. अंबिका म्हणाली त्याची काही कळजी करू नका. जानकोजीने तेलाचा घाणा चाल केला. थोड्याच दिवसात गावामध्ये एक नंबरचा व्यापारी म्हणून समजू लागला. अन्नाला एकेकाळी महाग असलेला जानकोजी मुलीच्या पायगुणाने श्रीमंत होऊ लागला. त्याच्या घाण्यातील तेल पिपानिशी संपु लागले. गावात एक वजनदार माणस समजू लागले. तेव्हा गावातील काही लोक मुलीला लग्नाकरिता मागणी घालु लागले पाहुणे मंडळी मुलीला पहाण्याकरिता येऊ लागली मुलीला दाखवा म्हणू लागली परंतु जानकोजीने मुलीला हाक मारली "अंबिका" म्हणून तर दुसर्याच खोलीत आवाज ऐकू यावयाचा असे बरेच वेळा झाले तरी मुलगी सापडली नाही. तेव्हा पाहुणे मंडळी रागावून निघून गेली त्या लोकांना जानकोजीला जातीबाहेर वाळीत टाकले व निघून गेले. त्याचवेळी बुर्हाण बादशाहाची पापी नजर गेली. त्याने घोडेस्वार, शिपाई पाठविले. तुझ्या या पापी विचाराचे फळ तुझ्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. बुर्हाणनगर निर्मनुष्य होऊन जाईल अशा प्रकारचा शाप दिला. तेव्हा गावात हा हा:कार माजला. गावात सर्व ठिकाणा ढाळ, उलट्या होवू लागल्या. लोक गाव सोडून जाऊ लागले. शापवाणी दिलेल्या मुलीबद्दल लोकांमध्ये कुतुहल निर्माण झाले. हा चमत्कार पाहून सर्वजण तिला देवी म्हणून नमस्कार करू लागले. आज ज्या ठिकाणी देवीचा देव्हारा आहे त्याठिकाणी जानकोजीस दिव्यरुप दाखविले. तेव्हा जानकोजी गडबडून गेले. त्यांना काहीच सुचेना असे बराच वेळ झाल्यावर देवी म्हणाली, तुला काय वर पाहिजे असल्यास मागून घे. परंतु त्यांना काहीच सुचेना. तेव्हा देवी म्हणाली मागे काय आले ते पहा तेव्हा जानकोजी ने मागे वळून पाहिले. त्याठिकाणी देवी गुप्त झाली. गुप्त झाल्यावर जानकोजी वेड्यासारखा करू लागला. "इथे होती. कुठे गेली" असे म्हणत, तो वेड्यासारखा हिंडू लागला. फिरता फिरता तो तुळजापुरी भारतीबुवांच्या मठात आला. त्याठिकाणी वारवावर उभा राहून त्याने देवीची करुणा भाकली. प्राण अर्पण करण्याकरिता उडी घणार तोच मुलगी देवीच्या स्वरुपात प्रगट झाली. इच्छित वर माग असे तिने जानकोजीस सुचविले. तेव्हा संत जानकोजी म्हणाला आई माझी सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुझी सेवा घडावी व सेवेचे व्रत पिढ्यांपिढ्या चालु राहावे हीच माझी इच्छा आहे. हे ऐकुण देवी म्हणालो, काय तु माझी सेवा करणार ? तू म्हणत असशील तर तू पाठविलेल्या पलंगावर पाच दिवस निद्रा करीन व पाठविलेल्या पालखीत शिलांगण करीन असा वर दिला. देवीच्या आज्ञाप्रमाणे दरवर्षी पलंग पालखी निघु लांगली. काही दिवसाने पलंग पालखी घेऊन जात असतांना वाटेत अष्टी तालुक्यातील पांढरी पोखरी गांवी त्यांचे प्राणोत्क्रमण झाले त्या ठिकाणी त्यांची समाधी असुन त्यांची आंतीम इच्छा लक्षात घेऊन शव तुळजापूरला शुक्रवार पेठेत नेले. त्या ठिकाणी समाधी बांधला व अश्मा व दशक्रिया बुर्हाणनगर व नागरदेवळे बोळात केला व ज्या ठिकाणी समाधी बांधली त्या ठिकाणी अजुन पर्यंत भगत लोकांची स्मशानभूमी आहे. ही परंपरा आजपर्यंत चालू असून त्यांचे वंशज अर्जुन किसन भगत पहात आहे.
मुर्ती वर्णन-
बुर्हाणनगर क्षेत्रातील मूर्तीला श्री. तुळजापूर भवानी जगदंबा नांवाने ओळखले जाते. श्री. भवानी मातेची मूर्ती काळ्या गडंकी शिलेची आहे. मर्तीच्या उजव्या बाजूस सिंह आहे. मूर्ती सुमारे ३ फूटी आहे. तसेच मूर्ती ही नाथपंथी आहे. कारण बुर्हाणनगरच्या जवळच सर्व नाथपंथीय मंदीर आहेत, कानिफनाथ, गोरक्षनाथ, मीननाथ, मच्छिद्रमाथ इ. सभोवती मंदीरे आहेत. तेव्हा नाथपंथी लोकांची आराध्य दैवत्य आहे. त्यांची पूजा करण्यात लोक येतात. हातात कमंडुल, तलवार, त्रिशूळ व डमरु असे आयुधे आहेत. मंदीर पुर्वमुखी असून येण्याकरिता उत्तरबाजूस रस्ता आहे. मंदीरा समोर दिपमाळ असून आत आल्यावर मंदीराच्या, दरवाजा समोरच तेलाचा घाणा व सिंहाची मूर्ती आहे. तेलाच्या घाण्याचे दर्शन घेऊनच मंदीरात प्रवेश केला जातो. बुर्हाणनगर येथे मुसलमानी राज्य असल्या मुळे या ठिकाणी मंदीर नव्हते परंतू पूर्वीपासून तुळजापूरला फक्त पालखी व पलंग जात असे. ती प्रथा श्री जानकोजी भगत देवकर तिळवण तेली यांने सुरु केली. तेव्हां त्यास नगरचा तेली या नावाने ओळखला जावू लागला. तर ती परंपरा आजपर्यंत चालु आहे. त्यांचे आजचे वंशज अर्जुन किसन भगत नगरचा तेली या नावाने ओळखले जात असून श्री. देवीच्या सीमोलंघनात दसर्याच्या दिवशी पालखी नेत असतो.
४) सभासदाची बखर -
कृष्णाजी अनंत सभासद यांनी शके १६१९ मध्ये लिहिलेली सभासदची बखर होय. ही बखर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १७-१८ वर्षांनी लिहिली आहे अफजलखान हा शिवाजी महाराजाना मारण्या करिता विजपूर दरबारातून विडा उचलून प्रताप गडाकडे निघाला तेव्हा त्याने प्रथम विजापूरहन निघताना नळदुर्गावर स्वारी करुन तेथील मंदीर नष्ट केले नंतर तुळजापूरला आले. तुळजापूरच्या सीमेवर आल्यानंतर त्याचा झेंड्याचा हत्ती ढालगुज नांवाचा त्या ठिकाणीच मरण पावला. अशुभ चिन्ह झाले. त्यांच वेळी अर्जुन किसन भगत यांचे पूर्वज तूळजापूरला होते त्यांनी तेथील पुजार्याच्या सहकार्याने मूळ मूर्ती लपवून पालखीत घालून थेट नगरला आणली. त्या ठिकाणी सिंहासनावर दुसरी मूर्ती ठेवून दिली. पुढे अफजलखानाने देवळात येवुन त्या ठिकाणी गाई कापुन नकली मूर्ती ठेवलेली होती. ती जात्यात घालून भरडून टाकली. नंतर त्यास समजले की, मूळ मूर्ती नगरच्या तेल्याने पळविली. तेव्हा अफजलखान हा त्याचा पाठलाग करीत तो भूम व परांडा तालुक्यापर्यंत आला. तेव्हा मूर्ती पालखीत घालून बाळा भगत हा अहमदनगरची निजामशाहीच्या हद्दीत घुसला त्यावेळेस शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे निजामशाहीचे वजीर आझम होते. तेव्हां अफजलखानास निजामशाहीच्या हद्दीत न जाता तेथुन परत यावे लागले. जाताना वाटेत सोमेश्वरचे महादेवाचे मंदीर नष्ट करुन गेला. नंतर पुढे पंढरपुर मार्गे वाई सातारा करून प्रतापगडावर गेला. त्या ठिकाणी शिवाजी महाराजाकडून मारला गेला.
५) तुळजापूर चा दसरा
महाराष्ट्रात तुळजापुर हे शक्तीपिठ असल्यामुळे त्या ठिकाणी विजयादशमीस देवतेचे भक्ताना भव्य दर्शन घडते. देवी शिलांगणाचा सोहळा देवी. मंदीरात फारच पहाण्यासारखा असतो. प्रागनात प्रत्यक्ष देवीची मुर्ती बुर्हाणनगरहुन आणलेली आजचे वंशज अर्जुन किसन भगत यांनी आणलेली पालखीत स्थानापन्न करुन देवीचे शिलांगण खेळते. ज्या पालखीत देवी स्थानापन्न होते ती पालखी दसऱ्याच्या आदल्या दिवशी तुळजापुरला येवुन ज्याना देवी प्रसन्न झाली, ते जानकोजी देवकर यांची समाधी शुक्रवारपेठ तुळजापुरला आहे, त्या ठिकाणी बसविली जाते. रात्री १२ वाजतां मिरवणुकीला सुरुवात होते. पालखी बरोबर पलंग सुद्धा असतो. मिरवणुकीत हजारो आराधी गोंधळी वगैरे भाग घेत असतात. अशा भव्य मिरवणुक निघुन पहाटे पहाटे देवळाच्या दरवाजा जवळ येते. त्या ठिकाणी स्थानिक पुजारी मंडळी पालखी पलंगाचे स्वागत करुन दर्शन घेतात व याला प्रसाद म्हणून खोबर्याच्या ३२ वाट्या द्यावा लागतो. शिलांगणात निघण्या पूर्वी पालखी मंदिराच्या होम कुंडाजवळील पिंपळाच्या पारावर बसविली जाते. त्या ठिकाणी पालखी परत पाणी वगैरे टाकून मंदीरातून काही दोर घेऊन परत चांगली बांधली जाते. त्याच वेळेस पहिली देवीस दहीदुधाची भोगी केली जाते. नंतर इतर भोगी होऊन देवीस ३२ पातळाने वेश्टिले जाते. त्यात पहिले पातळ आमचे असते. त्यास दिंड घालणे असे म्हणतात. नंतर देवीस आमचा मानकरी अर्जुन किसन भगत हा स्वतःच्या कडेस बांधन आणलेला नैवेद्य पेंडभाजीचा दाखवितो. व त्याच ठिकाणी स्वतःच्या करंगळीचा रक्ताचा टिळा देऊन देवळाच्या आंत गाभान्यात देवींसमोर बकर्याचे बलीदान करण्यात येते. तो मान आजपर्यंत चालू आहे. ते बकरे आजचे मानकरी अर्जुन किसन भगत यांचेकडे आहे. ती वहीवाट आजपर्यंतच चालु आहे. नंतर श्री. देवीस सिंहासनावरुन उठवून ती पालखीत आणतात. पालखीत आणतेवेळी वाटेत सभामंडपात जे ओटे बांधले आहे. त्या ठिकाणी नगरचे तेलीचे वंशज स्त्रीया आरती घेऊन बसतात. देवी पालखी मध्ये आणतात त्यावेळी आरती ओवाळली जाते. नंतर देवी पालखीत घालन देवळास एक प्रदक्षिणा घालण्यात येते. प्रदक्षिणा घातल्यावर पिंपळाच्या पारावर देवीसह पालखी बसविली जाते. त्यावेळी स्थानिक पुजारी देवीस आरती ओवाळण्यास येतात. आरती झाल्यानंतर पारावरुन पालखी खाली घेऊन देवी पलंगावर पांच दिवस विश्रांती करिता ठेवली जाते. नंतर पालखीचा पाळणा हाताने मोडुन तीचा होम केला जातो. दरवर्षी नवीन पालखी तयार केली जाते. दसर्याच्या दिवशी जे सकाळीच बलीदान झाले होते त्याचा संध्याकाळी नैवेद्य करुन देवीस दाखविला जातो. तेथील पुजार्यास ८० जोडीच्या भाकरी व बलीदानाचा प्रसाद ३२ मोडी महंतास, १६ जोडी होमवाल्यास इ. लोकास प्रसाद म्हणन वाटावा लागतो. नंतर पोर्णिमेच्या दिवशी पहाटे परत पेंडभाजीचा नैवेद्य दाखवून दोन बकर्याचे बलीदान करुन देवीस परत सिंहासनावर ठेवून देवीची ही परंपरा आज पर्यंत चालू आहे.
6) पालखी बनविण्याची पद्धत -
पूर्वीपासून दरवर्षी नवीन पालखी बनवित असे. पूर्वी नगरजवळ हिंगणगांवी ती पालखी बनवित असे. हिंगणगावचे कोंडाजी पाटलाचे नातलग राहुरीचे घांगरे यांना मुलबाळ होत नव्हते. तेव्हा त्याने नवसाने राहुरी गांवी पालखी तयार करून दिली व पालखी बसविण्यास पालखींस पांच खन जागा दिली. तेव्हा आज पर्यंत राहुरीस पालखी तयार होते. तेथून पालखी तयार होऊन गावोगांवी यात्रा करत करत नवरात्रामध्ये बुर्हानगरला ३ र्या माळेस यात्रा भरुन भिंगारमार्ग तूळजापुरला जात असे परंतु वाटेत अपसिंगे नांवाचे जहागिरदाराचे गांव लागते. त्या ठिकाणचा जहागिरदार हा अफझलखानाचा सरदार होता तेव्हा तो जहागिर दार फार चिडला होता. तेव्हा त्याने असे ठरवले की, नगरच्या तेल्यामुळे आमचा सरदार अफझलखान मारला गेला. तेव्हा ज्या वेळेस नगरच्या तेली हा पलंग पालखी घेऊन येईल त्यास बेलाशक मारुन पलंग पालखी पुढे जाऊ द्यावयाची नाही. त्यामुळे तुळजापूरला जाण्यास फार त्रास होत असे. नंतर नगरमार्ग सोलापूर रेल्वे सुरु झाली. तेव्हा पासून पालखी ही रेल्वेने जाऊ लागली. इकडे बहीण हाडकोबाई हीचे मुले जीव धोक्यात घालून तुळजापुरला पलंग पायी घेऊन येत असे. तेव्हा बाळा भगत यांने पलंगाचे उत्पन्न घेण्यास परवानगी दिली परंतु पलंगाचा धार्मिक विधी व बकर्याचे बलीदान वगैरे गोष्टी कायम ठेवल्या आहे. तसेच कल्लोळ तिर्थी आंघोळी करीत १०० माणसाचा दसरा व पोर्णिमेच्या पास त्या दिवशी मिळत असतो.