हिंगोली, ता. १३ : सेनगाव शहरातील तेली समाजातील एका व्यक्तीच्या मृतदेहाची अवहेलना केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याठिकाणी अंत्यविधीला विरोध म्हणून जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याची माहिती मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी दिली असून याबाबत रविवारी (ता.१३) एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सेनगाव शहराजवळ तेली समाजाची स्मशानभूमी आहे. या ठिकाणी तेली समाज अनेक वर्षांपासून अंत्यविधी करतात; परंतु येथे अंत्यविधी करण्यासाठी काही समाजविघातक व्यक्तींचा याला विरोध आहे. या कारणाने अनेकदा अंत्यविधी करणाऱ्यांत वादसुद्धा झाल्याची चर्चा ऐकायला मिळते. आता मात्र हा वाद तेली समाजाच्या मृतदेहाची अवहेलना करण्यापर्यंत पोचला आहे. यामुळे तेली समाजाविरुद्ध द्वेष भावना बाळगला जात आहेत.
अंत्यविधी पार पाडून मृताचे नातेवाईक घराकडे परतले. याचाच फायदा घेत आराेपीने पाण्याचा पाईप लावून अंत्यविधीच्या ठिकाणी जाणीवपूर्वक पाणी सोडले. यामुळे रविवारी मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी सेनगाव पोलिस ठाणे मृतदेहाची विटंबना करून भावना दुखावल्याबाबत गुन्हा दाखल केला.