संतू म्हणे मी तेल काढीयले । म्हणूनी नाव दिले संतू तेली ।।
संतु तेली घाणा करी। घाणा केल्यावर तुक्याचे अभंग लिही ।।
थोर संत संताजी जगनाडे महाराज म्हटलं की सोबत संत तुकाराम महाराज यांचे विचार आणि त्यांची गाथा डोळ्यासमोर उभी राहते. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म 8 डिसेंबर 1664 रोजी पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला. विठोबा जगनाडे व आई मायाबाई विठ्ठल भक्त होते. त्यामुळे संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाले. तेल्याचे घर असल्यामुळे मुलांना हिशोब करता येणे गरजेचे असते. त्यामुळे संताजी महाराजांना देखील लिहिता-वाचता आणि हिशोब करता येईल एवढे शिक्षण घेतले होते. घरची परिस्थिती चांगली होती त्यामुळे संताजी महाराजांना कसली कमी पडली नाही. संताजींवर लहानपणापासूनच धार्मिक संस्कार झाल्याने किर्तनाला, भजनाला जाण्याची त्यांना सवय होती.
त्याकाळी संतांचे समाजाला किर्तन, अभंगांच्या माध्यमातून शिकवण देण्याचे कार्य चालू होते. तेव्हा संत तुकाराम महाराजांची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात होती. संत तुकाराम महाराज आपल्या कीर्तनातून अंधश्रद्धा, पाखंडीपणा, बुवाबाजीवर प्रहार करत. एकदा संत तुकाराम महाराज संताजींच्या गावी कीर्तनासाठी आले होते. तिथे संत तुकारामांचा प्रभाव संताजींवर मोठ्या प्रमाणात पडला व त्यांनी संसार सोडण्याचा निर्णय घेतला. तेव्हा संत तुकारामांनी संताजींना समजावून सांगितले की, संसारात राहून परमार्थ साधता येतो. तेव्हापासून संत संताजी जगनाडे महाराज (संतू तेली) हे तुकारामांच्या टाळकऱ्यातील प्रमुख टाळकरी म्हणून ओळखले जाऊ लागले. पुढे तुकाराम महाराजांच्या सावलीत राहून त्यांचे विचार समाजापुढे ठेवू लागले आणि संतू तेली हे संत संताजी जगनाडे महाराज म्हणून नावारुपास आले. तुकाराम महाराज म्हणतात,
संताजी तेली बहुत प्रेमळ । अभंग लिहीत पैसे जवळ ।।
संत तुकाराम महाराजांचे विचार उभ्या महाराष्ट्रात पसरले होते. छत्रपती शिवाजी महाराजांची देखील कीर्तनास उपस्थिती असत. पुण्याच्या तुळशीबागेत संत तुकाराम महाराजांची भेट छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली व स्वराज्याच्या कार्यासाठी आशीर्वाद घेतले. त्या वेळेस संताजी महाराज देखील उपस्थित होते. संत तुकाराम महाराजांची गाथा रामेश्वर भटाच्या आदेशावरून इंद्रायणीत बुडवल्या गेल्या. ही बातमी कळताच तुकाराम महाराज अन्नपाणी सोडून बसले. पाण्यात बुडालेली गाथा चमत्काराने वर येणे शक्य नव्हते. त्यावेळी संत जगनाडे महाराजांनी गावोगावी जाऊन त्या गाथा पुन्हा लिहून जगत गुरु संत तुकाराम महाराजांचे उपोषण सोडले.
होता संताजीचा माथा । म्हणून वाचली तुकोबांची गाथा ।।
साडेतीनशे वर्षांपूर्वी शिक्षणाचे महत्त्व महाराजांनी दिले. आज 18 भाषेत तेरा देशात संत तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला जिवंत ठेवण्याचे काम संताजी महाराजांनी केले. यामुळे आपण सर्वजण तुकाराम गाथेला पाचवा वेद म्हणून सन्मान करतो.
रमेश शंकरराव सोनटक्के,शेवगांवकर