आपल्या भारत देशात अनेक संत, महंत आणि महामानव होवून गेलेत. त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा घेवून नवीन पिढी घडत आहे. संत आणि महामानवांच्या विचारांतून तरुण तयार होत आहेत. परंतु अनेक असे संत आहेत की त्यांचे कार्य, विचार दुर्लक्षित ठेवण्याचा प्रयत्न इथल्या मनुवादी - सनातनी व्यवस्थेला टिकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या लेखक - इतिहासकारांनी केलेला आहे. ज्या संत व महामानवांनी जाति भेदाचे निर्मूलन करुन समाजाला जोडण्याचे प्रयत्न केलेत त्यांच्याच विचारांना समाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्या गेला आहे. संतापैकी दुर्लक्षित असलेले एक संत म्हणजे संत संताजी जगनाडे महाराज. आम्ही एकमेकांना भेटल्यानंतर 'जय संताजी' म्हणून ज्यांच्या नावाचा घोष करतो. तेच संत संताजी जगनाडे महाराज.
संताजीचा जन्म पूणे जिल्ह्यातील चाकण या गावातील विठोबा व मथाबाई यांच्या पोटी सुदुंबरे येथे ८ डिसेंबर १६२४ ला झाला. वडिलोपार्जित व्यवसाय तेल काढण्याचा होता. त्यांचे कुळआडनाव सोनवाने होते. आर्थिक परिस्थिती उत्तम होती. त्यांचे शिक्षण त्या वेळच्या गरजेनुसार उत्तम झालेले होते. त्यांचे हस्ताक्षर सुंदर होते. त्या काळातील प्रथेनुसार लग्न वयाच्या दहाव्या वर्षी खेड येथील गावळे परिवारातील यमुना बाईशी झाले होते.
आयुष्याला कलाटणी :-
एकदा चाकण येथील चक्रेश्वराच्या मंदिरात संत तुकाराम महाराजांचे किर्तन असतांना तेव्हा संताजी आई-वडिलांसह किर्तनाला गेले होते. संत तुकाराम महाराजांच्या किर्तनातील
" आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्नें करु|"
शब्दची अमुच्या, जिवाचे जिवन, शब्दची वाटू धन जनलोका||
या शब्दांनी ते प्रभावित झाले. तेव्हा संताजीचे वय होते अवघे दहा वर्षे. तिथून संताजीने तुकारामांचे जे शिष्यत्व स्विकारले ते शेवटपर्यंत. महाराजांच्या किर्तनाचा एवढा प्रभाव पडला की, जिथे - जिथे तुकाराम महाराजांचे किर्तन असे तिथे - तिथे पायपीट करून किर्तनाला जात असत. सततच्या सानिध्यामुळे दोघांनाही त्यांची ओळख जन्मोजन्मीची वाटत होती. तुकाराम महाराजांच्या चौदा शिष्यामध्ये त्यांचा समावेश झाला होता. त्यातही त्यांचे स्थान वरच्या दर्जाचे होते. तुकाराम महाराज व संत संताजी महाराजांचे संबंधाबाबतीत तुकारामांचे पणतू गोपाळबुवा त्यांच्या अभंगांत म्हणतात,
संताजी तेली बहूत प्रेमळ,
अभंग लिहित बैसे जवळ
धन्य त्याचे भाग सबळ
संत तूकयाचा सर्वकाळ
वरिल अंभगावरुन आपल्या लक्षात येईल की संताजीचे आणि संत तुकाराम महाराजांचे त्रुणानुबंध कसे होते. दोघांच्याही त्रुणानुबंधा बाबतीत तुकाराम महाराजांची शिष्या बहिणाबाई पाठक यांनीही उल्लेख केला आहे.
संताजीच्या विचारांमध्ये मोठ्या प्रमाणात परिवर्तन होत होते. तुकाराम महाराजांचा विज्ञानवाद त्यांना पटू लागला होता. संताजी स्वत: लोकांना अंधश्रद्धा, कर्मकांड यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करु लागले. संत तुकाराम महाराजांनी सांगितले....
नवसे कन्या पूत्रे होती,
तरी का करणे लागे पती
सेंदरी ऐंदरी देवी दैवते,
कोण ती पुजे भुते खेते
आपल्या पोटा जी रडते, मागती शिते अवदान
याप्रमाणे ते तुकाराम महाराजांचा उपदेश लोकांपर्यंत पोहचवण्याचे कार्य करु लागले. या दोन्ही संता बाबतीत....
संतु - तुका जोडी लागे ज्ञानाची गोडी. असे म्हणने योग्य राहील.
जातीभेदाला विरोध -
भारतातील सर्व महामानवांनी मनुवाद्यांनी निर्माण केलेल्या जाती व्यवस्थेला प्रचंड विरोध करुन जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. या संदर्भात तुकाराम महाराज म्हणतात.....
विष्णूमय जग वैष्णवांचा, भेदाभेद भ्रम अमंगळ|
कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर, हेची वर्म सर्वेस्वर पूजनाचे||
तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या संदेशाप्रमाणे संताजी महाराजांनी सुद्धा जाती प्रथेला विरोध केला. यासंदर्भात त्यांच्याच अभंगाच स्मरण आपणास करून देतो. ते म्हणतात..... संतु - तुका म्हणे जाती दोनच त्या आहेत स्त्री - पुरूष, तपासूनी पाही
अभंग गाथा तारली -:
रामेश्वर व मंबाजी भट आणि मनुवाद्यांनी तुकाराम महाराजांच्या गाथेला दगड बांधून इंद्रायणी नदीत बुडविले. ती गाथा पांडूरंगाने नदीतून काढली. असे जे सांगितल्या जाते ते सत्य नसून आख्यीका आहे. संताजीचे महत्त्व लोकांना समजू नये, दोन समाजात एकी निर्माण होवू नये. यासाठी ती आख्यीका सांगीतल्या जाते. पुस्तक स्वतःहून पाण्यावर तरंगणे शक्य नाही. कोणतीही जडत्व असलेली वस्तू पाण्यावर तरंगणे शक्य नाही. मग पाण्यात बुडविलेली गाथा आम्हाला कशी उपलब्ध होवू शकली? तर ती संताजी जगनाडे महाराजांनी गाथेचे पूनर्लेखन केल्यामुळे. संताजी जगनाडे महाराजांना अनेक अभंग मुखोदगत होते. तसेच देहू, आळंदी,चाकण,खेड, पूणे परिसरात फिरून, लोकांच्या मुखातून वदवून ती लिहून काढली. म्हणजे अभंग गाथा संताजीच्या लेखनीने लोकसागरातून तारली. म्हणून म्हणावं वाटतो.....
संतुने रक्षुणी तुकोबाची गाथा |
सशक्त केला अमुचा माथा ||
परंतु तुकाराम महाराजांचे विज्ञानवादी, अंधश्रद्धेवर वार करणारे, बुवा- बापुंना सडो की पळो करून सोडणाऱ्या अभंगाना तारणारे संताजी जगनाडे महाराज मात्र उपेक्षित राहिले. याला वारकरी संप्रदाय सुद्धा अपवाद नाही...
तुका होई व्यक्त, पण संतु अव्यक्त,
संतु व्यतीरिक्त, तुका असे रिक्त |
तुकोबाची गाथा, मुखोदगत केली,
म्हणूनी अवतरली, अवनिवरी ||
साहित्य संपदा -:
संताजी जगनाडे महाराजांनी अभंग गाथा स्वहस्ताक्षरात लिहून काढली. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःचे अभंग लिहिले आहेत. तैलसिंधू, शंकरदिपीका हे ग्रंथ लिहिले आहेत. योगाची वाट, कवने, भजन आणि निर्गुणाच्या लावण्या लिहिल्या आहेत. गरज आहे अनुयायी म्हणून ते वाचून लोकसागरा पर्यंत पोहचविण्याची कारण संताजी महाराज काही एका जातीपूरते मर्यादित नव्हते, तर ते सर्व देशाचे होते. त्यांच्याच अभंगाचा दाखला देवून सांगायचं झाल्यास....
मारवाडी मारवाडचा, गुजराती गुजरातचा,
कानडी कानड्याचा, मुस्लमान तो दिल्लीचा |
मराठी तो महाराष्ट्राचा, तसा कोकणी कोकणचा,
पण संतु - तुका या देशाचा ||
अभंगाप्रमाणे संत संताजी जगनाडे महाराजांना सर्वव्यापक बनविन्याकरिता प्रयत्न करु या.
मरावे परी किर्ती रूपे -:
संताजी जगनाडे महाराजांनी कायम प्राणी मात्रांच्या सेवेला महत्त्व दिले आहे. त्यांनी गरजेपेक्षा अधिकच्या द्रव्य (धन) संचयाला विरोध केला. धन चांगल्या मार्गाने कमवून गरजेपेक्षा जास्तीचे द्रव्य लोकांच्या भल्याकरिता उपयोगी आणण्याचा मार्ग सांगितला. याबाबतीत त्यांच्यावर त्यांचे गुरू तुकाराम महाराजांचा प्रभाव दिसून येतो. तुकाराम महाराज म्हणतात....
जोडूनिया धन,उत्तम व्यवहारे | उदास विचारे, वेंच करि ||
या अभंगातून प्रेरणा घेवून संताजी महाराज लोकांना मार्गदर्शन करतांना म्हणतात....
जन्मोनी इहलोकी काय केले,
पुष्कळची धन मिळविले |
आणिक मिळविले वतन वाडी,
स्त्री आणि पोरा अवघ्याशी||
शेवटी ते म्हणतात......
संतु म्हणे, तुम्ही मागे ते सरावे |
मरावे परि किर्ती रूपे ||
संत तुकाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मनुवाद्यांनी संताजींनाही प्रचंड त्रास दिला, त्यांची संपत्ती हडपण्याचा प्रयत्न केल्या गेला. ब्राम्हणी जाचाला कंटाळून चाकण सोडून मामाचे गाव सुदुंबरे ला गेले. त्या परिसरात स्वरचित व तुकाराम महाराजांचे अभंग सांगून लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचे काम करत होते. शेवटी १८ डिसेंबर १६८९ ला सुदुंबरे येथे त्यांचा मृत्यू झाला. अनुयायी म्हणून गरज आहे ती संताजीनी घालून दिलेल्या मार्गावरून चालण्याची. त्यांचे विचार आत्मसात करून ,त्यांचे कार्य पुढे नेण्याची. हे जर आपण करू शकलो तरच खऱ्या अर्थाने त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना आपण अभिवादन केलं अस म्हणता येईल.
- अनिल भुसारी, तुमसर, जि. भंडारा