एैतिहासिक व स्वातंत्र लढ्याचा वारसा लाभलेल्या देवळी नगरीतील रामदास तडस यांनी लाल मातीतील पहेलवान ते दोन वेळा आमदार व दोन वेळा खासदारकी पटकावून दिल्ली पर्यंत धडक मारली आहे. स्वभावातील नम्रपणा व कुणालाही मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांचा हा प्रवास सहज शक्य झाला आहे. एकीकडे वर्धा जिल्ह्यातील राजकारणात प्रस्थापिताची दाणादाण झाली असतांना सामान्य कुटुंबातील रामदास तडस यांचा राजकारणातील चढता आलेख सर्वांना अचंबित करणारा ठरला आहे. १ एप्रिल १९५३ रोजी जन्मलेल्या तडस साहेबांनी आज वयाची ६८ वर्ष पुर्ण केलेली आहे. त्यांचे उर्वरीत आयुष्य निरोगी व सुखमय जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली जात आहे.
अगदी लहानपणापासून त्यांना कुस्ती खेळाचे वेड असल्याने ते वडिलोपार्जित व्यापारात रममान न होता शक्तीचे उपासक बनले. गुरुवर्य बाला उस्ताद नाशिकवार व सिताराम भोतमांगे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी श्रेष्ठ मल्ल म्हणून ख्याती मिळविली. कुस्ती खेळात सन १९७६, १९७८, १९८० व १९८२ ला सलग चार वेळा नागपूर, देवळी, खामगाव व पुन्हा नागपूर येथे 'विदर्भ केसरी'चा बहमान प्राप्त केला. संपूर्ण विदर्भात देवळी गावाचा नावलैकीक केला. कुस्तीतील अध्याय संपल्यानंतर राजकारणातील त्यांचा प्रवेश नविन जोमाचा गडी म्हणून चमत्कारिक ठरला.
देवळीत लोकप्रियतेच्या शिखरावर राहून सलग ३५ वर्षांपर्यंत या ठिकाणी नगराध्यक्षपदांची धुरा सांभाळणारे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी मोतीलालजी कपूर यांची एकहाती सत्ता सन १९८५ च्या देवळी न.प.च्या निवडणुकीत उलथावून लावली. यावेळी सन १९८५, १९९१ व १९९७ च्या निवडणूक कार्यकाळात त्यांनी ११ वर्षापर्यंत देवळीचे नगराध्यक्ष पद भुषविले. राजकीय सावज टिपण्याचा अप्रतिम तंत्र अवगत असल्याने त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. सन १९९४ ला स्थानिक स्वराज्य संस्थेची विधानपरिषदेची निवडणूक लढवून दणदणीत विजय संपादित केला.स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वर्धा-चंदपूर-गडचिरोली मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी एकसंघ भारतीय काँग्रेसच्या बलाढ्य उमेदवाराला चारही मुंड्याचित केले. त्यानंतर सन २००० च्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवडणुक लढवून विजय मिळविला. महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून त्यांनी सलग १२ वर्षापर्यंत आमदार पद भूषविले आहे. याच दरम्यान सन १९९८ पासुन आजपर्यंत ते महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या अध्यक्षपदी विराजमान आहे.
या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे संचालक, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष विदर्भ विभागीय कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष तसेच नागपूर विभागीय रेल्वे समितीच्या अध्यक्षपदाची त्यांनी धुरा सांभाळली आहे. सन २०१४ च्या तसेच सन २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी वर्धा लोकसभा मतदार संघातून घवघवीत यश संपादीत केले. वर्धा लोकसभा मतदार संघाच्या या दोन्ही निवडणुकीत त्यांनी २ लाख ते २ लाख ५० हजार फरकाने काँग्रेसच्या प्रस्थापित उमेदवारांना धक्का दिला. आजच्या घटकेला ते खासदार पदासोबतच भारतीय खाद्य निगम महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपद भुषवित आहे. या सोबतच त्यांची संसदेतून नागपूर एम्सच्या सदस्यपदी तसेच केंद्र सरकारच्या महत्वपूर्ण समित्यांवर वर्णी लावण्यात आली आहे.
हरिदास ढोक, देवळी