जळगाव - नाशिक विभागीय तैलिक महासभा अध्यक्ष तथा जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आर. टी. अण्णा चौधरी (वय ८३) यांचे शनिवार दि. १ मे रोजी पहाटे ४ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र तेली समाजात पोकळी निर्माण झाली. महाराष्ट्र राज्य तेली समाजात त्यांनी एक वेगळा ठसा निर्माण केला होता. नेहमी ज्येष्ठ म्हणून महाराष्ट्रातील अनेक नेते मंडळी त्यांचा आदर करीत असत व जो निर्णय ते घेतील तोच आदेश समजायचे. त्यांनी केलेले सामाजिक कार्य संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श मॉडेल म्हणून सतत प्रोत्साहन देत असे.
जळगाव शहरात त्यांनी महाराष्ट्रात कुठेही नाही अशी समाजाची भव्य दिव्य ३ मजली इमारत समाजाकडून एकही रुपया न घेता उभी केली. त्यात भव्य असे मंगल कार्यालय आणि गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रशस्त वसतीगृहाची निर्मिती करुन ते सर्व समाजातील विद्यार्थ्यांना अत्यल्प दरात उपलब्ध करुन दिले. सदरचे वसतीगृहातील विद्यार्थी भारत सरकारच्या सेवेमधील मोठमोठ्या पदावर आज कार्यरत आहेत. समाजासाठी सतत ६० वर्ष त्यांनी नि:स्वार्थपणे सेवा केली.
खूप मेहनतीने गेल्या ६० वर्षापासून समाजाचे मोठे संघटन त्यांनी उभे केले. त्यामुळेच राजकारणात समाजाची मोठी ताकद निर्माण झाली. समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून गेल्या ३५ वर्षांपासून सतत गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करणारा जळगाव हा महाराष्ट्रातील एकम पत्र जिल्हा आहे. तेली समाजाचे प्रतिनिधित्व करीत असताना अनेक वेळा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन त्यांनी केले. त्यात एकवेळेस मोफत राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा घेतला.
अनेक परिवाराचे कौटुंबिक कलहातून उद्ध्वस्त होणारे संसार वाचवून गेल्या ५० वर्षापासून मोलाचे कार्य केले. समाजातील मोठ्या व्यक्तीपासून गरीबातील गरीब व्यक्तीपर्यंत त्यांचा कायम संपर्क होता. सामाजिक जीवनात काम करीत असताना राजकीय जीवनातही आपल्या कार्याचा ठसा त्यांनी उमटविला होता. जळगाव शहर मनपाचे ते माजी नगरसेवक तसेच मनपा शिक्षण मंडळाचे उपसभापतीपद ही त्यांनी भूषविले होते. त्यांच्या जाण्याने जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्र तेली समाजात मोठी हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात तेली समाजातर्फे शोकसभेचे आयोजन करण्यात आले तसेच अखिल भारतीय तैलिक महासभेचे अध्यक्ष, मा. मंत्री जयदत्त क्षिरसागर, महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष खा.रामदास तडस, मा. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेश महासचिव प्रा. भूषण कर्डिले, प्रदेश कार्याध्यक्ष अशोक व्यवहारे, ज्येष्ठ उपाध्यक्ष हिरालाल चौधरी, गजानन शेलार, मा. आ. शिरीष चौधरी, प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, मा.आ.संतोष चौधरी यांच्यासह सामाजिक व राजकिय क्षेत्रातील व्यक्तींनी दुःख व्यक्त केले. ते जळगाव महानगर पालिकेचे नगरसेवक महेश चौधरी यांचे ते वडील होत.