भुसावळ : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या १४६ व्या तुकडीसाठी येथील संकल्प देवीदास चौधरी याची नुकतीच निवड झाली.
एनडीए प्रवेश प्रक्रियेचा निकाल भारतीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससीने) नुकताच जाहीर केला आहे. सैन्यात अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याचा संकल्प भुसावळ येथील संकल्प देवीदास चौधरी याने केला व त्यासाठी त्याने अत्यंत परिश्रम घेतले. अखेर आधी लेखी परीक्षा व त्यानंतर एसएसबी अर्थात सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या मुलाखतीत पात्र झाल्यानंतर यूपीएससीने जाहीर केलेल्या अंतिम निकालात संकल्पचे नाव झळकले. त्याने अखिल भारतीय गुणवत्ता यादीत ३४४ वा क्रमांक मिळविला. संकल्पचे एनडीएमध्ये जाण्याचे स्वप्न पूर्ण झाले. त्याला सेवानिवृत्त लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर यांचे मार्गदर्शन लाभले. संकल्पचे शालेय शिक्षण भुसावळच्या ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये झाले असून दहावी सीबीएससी परीक्षेत त्याला ८२.२ टक्के गुण मिळाले होते. अकरावी व बारावीचे शिक्षण औरंगाबाद येथील छत्रपती शिवाजी प्रिपेरेटरी ज्युनियर कॉलेजमध्ये केले. वडील देवीदास चौधरी वरणगावच्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आई अनिता चौधरी गृहिणी आहे. संकल्प याने यशाचे श्रेय आई-वडील लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर आणि केदार रहाणे औरंगाबाद यांना दिले आहे.