महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. ह्या भूमीतच संत एकनाथ,संत ज्ञानेश्वर, संत सावता माळी, संत गोरा कुंभार, संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नरहरी सोनार,संत नामदेव, संत निवृत्तिनाथ, संत मुक्ताबाई, संत समर्थ रामदास, संत रोहिदास, ह्या व इतर बऱ्याच संतांनी आपल्या विचारांनी आणि साहित्यांनी समाजाला प्रेरणादायी अशी शिकवणूक दिली. सर्व संतांनी नेहमी सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक एकतेचा संदेश देण्यासाठीचाच पुढाकार घेतल्याचे पहायला मिळते. अश्याच जगदगुरू तुकोबारायांच्या अभंग गाथेचे लेखनकर्ते व समस्त तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे महाराजांची ८ डिसेंबर रोजी जयंती... संताजी जगनाडे महाराजांच्या जीवनाचा थोडक्यात मांडलेला प्रयत्न.
समस्त तेली समाजाचे आराध्य दैवत म्हणून संताजी जगनाडे महाराज ओळखले जातात. जगदगुरू तुकोबारायांच्या काव्यरूपी अभंगाचे लेखनकर्ते म्हणून संताजी जगनाडे महाराज सर्व प्रचलित आहे. संताजी जगनाडे महाराज लहानपणापासूनच धार्मिक प्रवृतीचे होते. त्यामुळे संताजी सतत वेगवेगळ्या मंदिरात होत असलेल्या कीर्तनाला जायचे. वयाच्या चौदाव्या वर्षी संताजींनी गावातीलच मंदिरात संत तुकारामांना पाहिलं आणि त्यांचं कीर्तन ऐकलं. संत तुकारामांच्या कीर्तनाने संताजी एवढे भारावून गेले की त्यांनी संसार त्यागून जगदगुरू तुकोबारायांचे शिष्य म्हणून आपलं आयुष्य वाहून घ्यायचं ठरवलं. त्यांनतर ते सतत संत तुकारामांच्या कीर्तनाला जावू लागले. वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या कीर्तनाला संताजींची उपस्थिती संत तुकारामांना जाणवू लागली. संताजींनी संत तुकारामाचे शिष्यत्व स्वीकारले.
अल्पावधीतच संताजी संत तुकारामाच्या चौदा टाळकऱ्यापैकी एक प्रमुख टाळकरी बनले. पण तुकोबारायांनी संताजींना सांगितले की, संसार करता करता भक्तिमार्गाने परमार्थ ही साधता येतो. त्यामुळे संताजींनी प्रपंच न त्यागता उरलेल्या वेळात तुकोबारायांसमवेत कीर्तनाला जात असे.
पुरातन रूढी परंपरेला अनुसरून वावरणाऱ्या प्रस्थापित मंडळीविरोधात तुकोबारायांनी आपल्या काव्यरूपी अभंगाने लोकांत धार्मिकतेची ओढ रूझविली. वाईट रूढी, प्रथा, परंपरा, कर्मकांड, अंधश्रद्धा व जातीभेद मानणाऱ्या लोकांची हुकूमशाही मोडत अभंगाद्वारे ह्या सर्व वाईट गोष्टींचा होणारा परिणाम तुकोबारायांनी आपल्या अभंगाने अधोरेखित केला. आपल्या पाठीशी साक्षात विठ्ठल असल्याकारणाने जगदगुरू तुकोबारायांनी वाढत्या विरोधाला कधीच उत्तर दिले नाही.
प्रस्थापितांनी अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडवली, मात्र, तुकोबाराय तीरावरच विठ्ठलाचं नामस्मरण ध्यान करत बसले होते. अन्न पाण्याशिवाय संत तुकारामांनी देहत्याग करू नये म्हणून संताजींनी त्यांना स्वतःला पाठ असलेले अभंग आणि परिसरात फिरून लोकांना पाठ असलेले अभंग नव्याने लिहन संत तुकारामांना ते गाथेच्या स्वरुपात अर्पण केले. संताजी महाराजांच्या ह्या ऐतिहासिक कार्याची दखल म्हणून जगभरात विखुरलेला तेली समाज आराध्यदैवत श्री संत संताजी जगनाडे महाराजांचे जन्मोत्सव आनंदात व भक्तीभावात साजरा करतात.
अवघ्या तेरा दिवसात संताजी जगनाडे महाराजांनी संपूर्ण अभंगगाथा लिहिली व आपल्या गुरूचरणी भेट केली. अभंगगाथेला पुन्हा पाहून जगद्गुरू तुकोबाराय गहिवरले. तुकोबारायांच्या सहवासामुळे संताजी जगनाडे महाराजांना आध्यात्मिक प्रवास करता आला व त्यांच्या मागोमाग चालण्याचा संताजींना योग आला. संताजी जगनाडे महाराज हे नेहमी जगदगुरू तुकोबारायांच्या सावलीसारखे सोबत असायचे. तुकोबारायांच्या भक्तिरसात आपलं आयुष्य वाहिलेल्या संताजींनी त्यांच्या अभंगाच्या लेखनाची जबाबदारी पार पाडली. त्यासोबतच संताजींनी तैलसिंधु आणि शंकरदीपिका हे दोन स्वतंत्र ग्रंथ लिहिले. ज्यात त्यांची व तुकोबारायांच्या (गुरु-शिष्याच्या) नात्यातील असलेले भाव मांडले. संताजी जगनाडे महारांच्या आयुष्याचा अर्थ म्हणजेच तुकोबारायांच्या अभंगांचे लेखन व त्याचे जिवापलीकडे जोपासना याच शब्दांत सांगता येईल. जणू तेवढ्याकरिताच ते जन्माला आले होते. श्री तुकोबारायांच्या सहवासातील संत मेळाव्यात तुकोबांच्या अभंग गाथेचे लेखनकर्ते संताजी जगनाडे महाराजांचे स्थान अनन्यसाधारण आहे.
शिवाजी भाऊराव देशमाने