अहमदनगर : समाजाची उन्नत्ती व्हावी, यासाठी संघटन महत्वाचे असते. पदाधिकार्यांच्या चांगल्या कामातून हे शक्य होते. तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने गेल्या काही वर्षात समाज बांधवांचे मोठ्या प्रमाणात संघटन करुन एकीचे बळ दाखवून दिल्याने प्रश्न सुटत आहे. त्यामुळे विविध उपक्रमांतून समाजाची प्रगती साध्य होत आहे. त्यासाठी अनेकांचे हातभार लागत आहे. आज ट्रस्टच्या कार्यालयाचा शुभारंभ झाल्याने समाज बांधवांना आपले प्रश्न, समस्या, उपक्रम, चर्चा करण्यासाठी हक्काचे ठिकाण झाले आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून समाजाच्या विकासास चालना मिळेल, असे प्रतिपादन राहुरीचे माजी नगराध्यक्ष आसाराम शेजूळ यांनी केले.
तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने नूतन संपर्क कार्यालयाचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष आसाराम शेजूळ यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी माजी सभापती सचिन जाधव, ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे, उपाध्यक्षा सौ.निता लोखंडे, विश्वस्त प्रसाद शिंदे, गोकूळ कोटकर, मंगेश क्षीरसागर आदि उपस्थित होते.
प्रास्तविकात ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे म्हणाले, आज उद्घाटन होत असलेल्या कार्यालयाची मुळ वास्तू ही १९४० साली कै.सवळेराम गुंडीबा देवकर यांनी श्री संत संताजी महाराजांच्या कार्याची महती समाजबांधवांपर्यंत पोहचविण्यासाठी समाजास दान केली. त्यांच्या या महान कार्याची आठवण कायम राहावी म्हणून या जागेतील सभागृहास कै.सवळेराम गुंडिबा देवकर' असे नामकरण करुन त्यांच्याप्रती कृतज्ञाता व्यक्त केली आहे. समाजाच्या विकासासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. त्यामुळेच ट्रस्टच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे..
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज क्षीरसागर यांनी केले तर आभार गोकूळ कोटकर यांनी मानले. कार्यक्रमास सचिन शेंदूरकर, प्रकाश सैंदर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, शोभना धारक, ॲड. विनायक दारुणकर, अशोक डोळसे आदि उपस्थित होते.