संताजी महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ मध्ये झाला. आजोबा भिवाशेठ जगनाडे, बडील विठोबाशेठ व आई सुदुंबरे येथील काळे घराण्यातील मथुबाई. संताजीचे शिक्षण लिहितावाचता येणे व हिशोब ठेवणे यापुरतेच होते. घरची परिस्थिती तशी चांगली होती. त्यामुळे संताजीना कमतरता कसलीच भासली नाही. वयाच्या १० व्या वर्षीच वडिलांनी संताजींना तेलधंद्याचा परिचय करून दिला. लग्नही ११ व्या वर्षीच खेड येथील कहाणे घराण्यातील, यमुनाबाई यांच्याबरोबर झाले. यमुना वयाने फारच लहान होत्या. संसार म्हणजे काय याचे दोघांनाही ज्ञान नव्हते. त्या काळात बालविवाह पद्धत समाजात रूढ होती. संताजी महाराजांची व तुकाराम महाराजांची भेट शके १५६२ मध्ये म्हणजेच जानेवारी १६४० मध्ये झाली. तुकोबांच्या पहिल्या पत्नीला म्हणजेच रखमाबाईला संतु नावाचा मुलगा झाला. त्याचा दीड-दोन वर्षातच मृत्यू झाला. रखमाबाईचेही दम्याच्या दीर्घ आजाराने निधन झाले. संताजींना कीर्तनात पाहताच तुकारामांना आपल्या पुत्राची आठवण झाली. त्यांच्या मुलाचे नावही संतु असल्या कारणाने. त्यांना संताजींबद्दल प्रेम, आपुलकी निर्माण झाली. त्यामुळे महाराजांनी संताजींना आपल्या सान्निध्यात ठेवले.
तुकाराम महाराजांचे लेखक म्हणून संताजी महाराजांचे लेख व भजने आढळून येतात. वास्तविक पाहता तकाराम महाराजांना अशा प्रकारच्या लेखनिकाची गरज होती असे नव्हते. ते स्वत: उत्तम प्रकारे लिहू व वाचू शकत होते; परंतु कीर्तनप्रसंगी त्यांच्या तोंडून निघणारे शीघ्रकाव्य व नवीन अभंग संताजी लिहून ठेवत असत.
संताजींनी तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानले होते. आणि त्यांच्यामुळेच तुकाराम महाराजांचा अनमोल साहित्याचा ठेवा आज आपल्याला वाचायला मिळत आहे. संताजींचे अक्षर फारच सुंदर होते. तुकारामाचे नवीन नवीन अभंग ते आपल्या वहीत लिहुन ठेवत असत. हजारो अभंग त्यांनी संग्रहित करून ठेवले आहेत. तुकाराम महाराजांचा महिमा लोकांना केवळ संताजी महाराजांमुळेच समजला. त्याला इतिहास साक्ष आहे. त्यांची स्मरणशक्ती खरोखरच वाखाणण्यासारखी होती. त्यांनी स्वतः रचलेले घाण्याचे अभंग आजही अनेक ठिकाणी विशेषत: ग्रामीण भागातून ऐकावयास मिळतात. अगदी तरुण असतानाच संताजी महाराजांना तुकाराम महाराजांचे कीर्तन ऐकण्यास मिळाले. आणि तेव्हापासून त्यांना कीर्तनाची ओढ निर्माण झाली व त्यातूनच ते तुकाराम महाराजांकडे आकर्षित झाले, जसे काही तुकाराम महाराजांशी त्यांचे पूर्वजन्मीचे नातेच होते.
तुकाराम महाराजांची गाथा संताजी महाराजांच्या कठोर परिश्रमामुळे जिवंत राहू शकली. तुकाराम महाराजांचा नियमित सहवास व मार्गदर्शनामुळे संताजींची जडणघडण व्यवस्थित झाली. विशेषकरून मोगली आक्रमणाच्या वेळेला तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या व कीर्तनाच्या आणि कवितांच्या वह्यांचे रक्षण संताजी महाराजांनी जिवाची पर्वा न करता केले.
चाकणच्या कीर्तनानंतर संताजी सतत तुकाराम महाराजांच्या सहवासात राहू लागले. तुकाराम महाराजांचा सहवास सतत मिळत गेल्यामुळे तुकारामांच्या अभंगांचे लेखन रोज होऊ लागले. महाराजांच्या सहवासाचा, कीर्तनाचा संताजीच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. व घराकडे आणि संसाराकडे दुर्लक्ष होऊ लागले. रोज होणाऱ्या कीर्तनातून आणि अभंगांतून सामान्य माणसांच्या समस्येचे निवारण होत होते. समस्येचे निवारण करण्यासाठी कोणी ब्राह्मणाकडे जात नव्हते. त्यामुळे ब्राह्मणांचे नुकसान होऊ लागले. त्यांना दक्षिणा मिळणे बंद झाले आणि त्याचा सर्व राग तुकाराम महाराजांवर निघाला. तुकाराम महाराजांच्या विरोधात धर्मसभा घेज धार्मिक न्यायालयात खटला दाखल करण्यात आला. व त्या ठिकाणी रामेश्वर भट स्वत: न्यायधीश म्हणून काम पाहत होते आणि त्यांनी निर्णय दिला तो असा, तुकारामाला गाथा लिहिण्याचा अधिकार नाही. कारण तो शुद्र आहे. कीर्तन सांगणे व पाया पडून घेण्याचा अधिकार नाही. त्याची संपत्ती जप्त करून गावातून हाकलून द्या. आणि त्याच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून टाका. अशा प्रकारचा निकाल स्वतः रामेश्वर भटाने दिला. तुकाराम महाराजांना बर्याच वेळा मारहाण झाली. त्याचे संताजी महाराज साक्षीदार आहेत. त्यांनी तुकाराम महाराजांना एकटे कधी सोडले नाही. संताजी महाराजांनासुद्धा अनेक वेळा धमक्या देण्यात येत होत्या. त्यांच्यावर अनेक वेळा हल्लेही झाले आहेत. त्या तुक्याची संगत सोडतो की नाही? नाहीतर तू जिवंत राहणार नाहीस. आणि तुझा तो तुक्याही ! तीपण संताजी महाराज घाबरले नाहीत. रामेश्वर भटाने तुकोबारायांच्या गाथा इंद्रायणीत बडविण्याचा निकाल तर दिलाच होता. आयुष्यभर कष्ट करून अभंगांचे लिखाण केलेल्या सर्व वह्या धार्मिक दबावामुळे पाण्यात बुडविण्यात आल्या.
संताजी महाराजांनी पुढील तेरा दिवसांत तहान-भूक हरपून आपल्या प्रबळ स्मरणशक्तीच्या जोरावर पुन्हा अभंग लिहायला सुरुवात केली. सर्व अभंग, कीर्तन पुन्हा जसेच्या तसे लिहून काढले, म्हणून आज तुकाराम महाराजांच्या गाथा आपल्याला वाचायला मिळत आहेत.
दिलीप शिंदे कार्याध्यक्ष, तिळवण तेली समाज, पुणे