घोटी - संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात घोटीत साजरा करण्यात आला. अभंगांच्या गजरात, संताजींचा जयजयकार करत समाज बांधवांनी सोहळ्यात सहभाग घेतला. प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांच्या श्रुश्राव्य कीर्तनातही भाविक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.
तेली समाज बांधव व संताजी युवक मंडळाच्या पुढाकारातून घोटीत संतश्रेष्ठ श्री संताजी महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी श्री संताजींचा पुतळ्याचे विधीवत पूजन करून नगरप्रदक्षिणा करण्यात आली. यावेळी अभंग, भजने घेत संतांच्या नामाचा जयजयकार करण्यात आला. घोटीतील श्री संताजी महाराजांच्या चरित्रावर आधारित ह.भ.प. प्रकाश महाराज कदम यांचे प्रवचन झाले.
यावेळी ह.भ.प. रघुनाथ महाराज किर्वे यांनी संताजींचे कार्य, विचारधारा व योगदान याबाबतची माहिती विशद करून संतांच्या विचाराने व आचरणाने जीवनाची वाटचाल केल्यास जीवन सुखी होते, असे नमूद केले.
शिवलीला पारायनाने सांगता करण्यात आली. श्रीपादबाबा बालभजनी मंडळ हे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण होते. सायंकाळच्या सत्रात महाराष्ट्रातील प्रख्यात कीर्तनकार ह. भ. प. केशव महाराज उखळीकर यांचे कीर्तन झाले.