कणकवली, ता. २९ : खेडोपाडी वाहतुकीच्या साधनांची कमतरता, प्रसंगी पाच ते सात कि.मी. प्रवास करून शिक्षण घेणे अशा अनेक प्रतिकूल आव्हानांवर मात करून आपले धेय्य गाठणारी मुलेच भविष्य घडवतात, असे मार्गदर्शन मुंबई म्युनिसिपल मजदूर युनियनचे गोविंद कामतेकर यांनी केले.
गडमठ येथे तेली समाज संघटनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम झाला. यात श्री. कामतेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सेवानिवृत्त पशुधन विकास अधिकारी डॉ. वासुदेव (भाई), गडमठ सरपंच ऊन्नती पावले. पोलिस पाटील श्री. राऊत, गणपत मालंडकर, मंडल अधिकारी दिलीपकुमार पाटील, मोहन पडवळ, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रासम, शिल्पकला कामतेकर आदी उपस्थित होते.
आपल्या देशाचा सर्वांगीण विकास व्हावयाचा असेल तर गांधीजींना अभिप्रेत असलेल्या 'खेड्याकडे चला' हा नारा आपण प्रत्यक्षात अंमलात आणला पाहिजे. इथल्या शेतकरी श्रमिक कष्टकऱ्यांची मुले प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शिक्षण घेऊन पुढे जात आहेत हे अत्यंत कौतुकास्पद असून समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन
श्री. कामतेकर यांनी केले. यानंतर उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. तसेच, मान्यवरांच्या हस्ते गडमठ गावातील तेलीवाडी, कुंभारवाडी, राऊतवाडीतील मुलांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्या वाडेकर हिने आभार मानले.