कोल्हापूर : तेली समाज विखुरला आहे. समाजाची प्रगती साधायची असेल तर संघटित झाल्याशिवाय पर्याय नाही. संघटित झाल्याशिवाय आरक्षणासह अन्य मागण्यांचा विचार होणार नाही, हे समाजबांधवांनी लक्षात घेऊन कामाला लागावे, असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
अखिल भारतीय तैलिक साहू महासभा नवी दिल्ली, प्रदेश तेली महासंघ, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने तेलीसमाजाचामार्गदर्शन मेळावाबसंतबहार रोडवरील नष्टे लॉनवर झाला. यावेळी क्षीरसागर यांच्या हस्ते, विजय चौधरी, आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थित मेळाव्याचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी होते.
माजी मंत्री क्षीरसागर म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा आरक्षण दिले. त्यामुळे समाजातील वंचित घटकांनान्याय मिळाला. आरक्षण दुर्बलांचा हक्क आहे, ते मिळावे यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. तेली समाज संपूर्ण देशात असून तो विखुरला आहे. समाजातील तरुणांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आहे.
प्रदेश कार्याध्यक्ष सुरेश वाघमारे यांनी समाजाच्या संघटनांवर भर देऊन उद्योग, शिक्षण यामध्ये तेली समाजाला प्रतिनिधित्व मिळाल्याशिवाय प्रगती होणार नसल्याचे सांगितले. विक्रांत चांदवडकर यांनी समाजातील नाती अधिक घट्ट करण्याची गरज आहे. त्यासाठी पालकांनी समाज प्रबोधन करावे, असे सांगितले.
आ. बावनकुळे म्हणाले,समाजाने प्रगतीसाठी झोकून द्यावे. ओबीसी आरक्षणावर राज्य सरकार उदासीन आहे. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीला राज्य सरकाराने भक्कम बाजू मांडली पाहिजे. अन्यथा आरक्षण मिळणार नाही. राज्य सरकाराने केंद्र सरकाराच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा आरक्षणावर लक्ष केंद्रीत करावे. महाराष्ट्रावर वीज संकट आले आहे. याला राज्य सरकार जबाबदार आहे. कंपन्यांचे वीज, कोळशांचे पैसे थकले आहेत. कोळसा संकटापूर्वीच कंपन्यांनी कोळसा घ्या, असे सांगितले होते. तरीही सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे महाराष्ट्र अंधारात जाण्याची भीती आहे.
विजय चौधरी म्हणाले, शासकीय कर्मचारी-अधिकारी महासंघ तयार केला आहे. समाज संघटित करण्यासाठी यापुढे काम करा. व्यापारात प्रगती कधी, कशी करायची, हे सिंधी समाजाकडून शिका. महिला प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रिया महिंद्र, रवींद्र येनूरकर, विजय रत्नपारखी, योगेश मिसाळ, रवी कोरे, राजीव माहुरे प्रमुख उपस्थित होते. प्रास्ताविक विजय संकपाळ तर जिल्हाध्यक्ष विश्वनाथ माळकर यांनी आभार मानले.