जालना - श्री संताजी जगनाडे महराजांच्या कृपेने अखंड हरिनाम सप्ताह व संगीतमय श्रीमद् भागवत कथा ज्ञान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गत रविवारपासून ( ता. १७ ) सुरु झालेल्या या कार्यक्रमाची सांगता रविवारी ( ता. २४ ) होत आहे.
बाबुराव व्यवहारे व नानासाहेब वाघचौरे आणि रंगनाथ राऊत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित कथेचे निरुपण हभप भागवताचार्य भगवान महाराज कचरे यांनी केले. तर सप्ताहात ह.भ.प. भाऊसाहेब महाराज पन्हाळकर ( पैठण ), हभप अशुराज महाराज पूरी (बीड), ह. भ. प. कन्हैय्या महाराज शिंदे (आळंदी), हभप वालकिर्तनकार प्रणव महाराज तौर ( आळंदी ), हभप ओमकार महाराज वाघमारे ( मादळमोहीकर ), हभप शितलताई गुरव (आळंदी), ह. भ. प. किशोर महाराज भिसे यांचे अनुक्रमे दैनंदिन हरिकीर्तन झाले. उद्या रविवारी सकाळी ११ ते १ वाजेदरम्यान कांवी येथील हभप कृष्णा महाराज कुरहे यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मोदीखाना परिसरातील तिळवण तेली समाज पंचायती वाड्यातील या सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायणाचे नेतृत्व आळंदी येथील ह. भ. प. कन्हैय्या महाराज शिंदे यांनी केले.
या सप्ताहात ज्ञानराज अध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या नेतृत्वाखाली काकडा, विष्णू सहस्त्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, तुकाराम महाराज गाथा भजन, दुपारी संगीतमय श्रीमद् भागवत कथा, सायंकाळी हरीपाठ तर रात्री ९ ते ११ यावेळेत हरिकिर्तन आणि त्यानंतर जागर आदी कार्यक्रम झाले. रविवारी ( ता. २४ ) होणाऱ्या या सांगता समारंभास सर्वांनी उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक सौ. सुनिता व्यवहारे यांनी केले आहे.