दिव्यत्वाची जेथे प्रचीती तेथे कर माझे जुळती." राहाता तालुका व अहमदनगर जिल्हा संघटन करण्यासाठी तनमनधनाने झोकून देणारे,जेष्ठ मार्गदर्शक थोर प्रतिभाशाली, ज्यांनी समाजापुढे पुढारलेले विचार मांडून समाज सुधारण्याचे कार्य ज्यांनी केले ते कै.प्रभाकरराव रंगनाथ नागले यांना त्यांच्या पुण्यस्मरणार्थ दिनी भावपूर्ण आदरांजली.
नागलेसरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथे ५ जून १९४५ ला झाला.त्यांचे सर्व शिक्षण बेलापूर व श्रीरामपुर येथेच झाले.वयाच्या विसाव्या वर्षी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय कोळपेवाडी येथे २४ जुलै १९६५ ला ज्ञानदानाचे पवित्र कार्याला सुरुवात केली. कोळपेवाडी येथे १५ वर्ष व प्रवरानगर येथे २० वर्षे अशी एकूण पस्तिस वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले.
सेवा काळात विद्यार्थ्याच्या अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविले.काही शिक्षक,डॉक्टर, वकील,सी ए, इंजिनिअर,सरकारी उच्च पदस्थ अधिकारी झाले. संस्कृत, हिंदी भाषेचे पंडीत होते.मराठी विषयात पीएचडी करणारे त्यांच्याकडे प्रबंध लिहून मार्गदर्शन घेत.मराठी व्याकरणात त्याचा हातखंडा होता. नियतकालिका व स्मरणिकांचे संपादक/कार्यकारी संपादक म्हणून काम केलं तर वृत्तपत्रांमधून स्तंभलेखन केले. त्याच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शासनाने तत्कालीन कृषि राज्यमंत्री श्री.मधुकररावजी पिचड साहेब यांचे हस्ते व खासदार यशवंतराव गडाख यांचे अध्यक्षतेखाली ५ सप्टेबर १९८५ ला "आदर्श शिक्षक" पुरस्कार देवून सन्मान केला. अहमदनगर जिल्ह्यातील पहिला वधू-वर मेळावा घेण्यासाठी तन मन धन लावून पुढाकार घेऊन मेळावा यशस्वीपणे पार करून निस्वार्थी, प्रामाणिकतेने हिशोब देणारे सच्चे कार्यकर्ते होते.अहमदनगर जिल्हा तेली समाजाच्या वतीने आदर्श ,निस्वार्थी,निगर्वी निस्पृह ,निर्भिड सच्चा समाज सेवक म्हणून तत्कालीन जगदंबा स.सा कारखान्याचे चेअरमन भूतपुर्व राज्यमंत्री श्री. आबासाहेब निंबाळकर यांच्या हस्ते व लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता श्री.वसंतराव रत्नपारखी यांचे अध्यक्षतेखाली चांदीचे स्मृती चिन्ह,शाल श्रीफळ देऊन सन्मान केला. संत जगनाडे महाराज यांचे चरित्र व तेली समाजातील साहित्यिक विचारवंत,कलावंत, राष्ट्रीय नेते यांची माहिती पुस्तिका लिहून अहमदनगरचे तत्कालीन नगराध्यक्ष त्र्यंबक उर्फ सावळेराम रघुनाथ दारुणकर यांचे हस्ते प्रकाशित केले.
प्रवरानगर, बाभळेश्वर, राजूरी ,ममदापुर आणि कोल्हार या पाच गावांतील समाज बांधवांना संघटित करून 'संताजी महाराज जगनाडे' यांची पुण्यतिथी साजरी करण्यात पुढाकार घेऊन प्रतिवर्षी साजरी करण्याचा परंपरा चालू केली.
राहाता तालुक्यातील तेली समाज बांधवांची टेलीफोन डायरी तयार करण्यासाठी प्रत्येक गावात घरोघरी जाऊन समाज बांधवांची माहिती घेतली. "जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले" या उक्तीला अनुसरून समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील मुलामुलींचे शालेय गणवेश,फी, शैक्षणिक साहित्याची मदत करुन त्यांचे भविष्य उज्ज्वल केले. वधुवरांचे विवाह जमविले. अशा प्रतिभासंपन्न,निस्पृह चारित्र्यवान कर्तव्यदक्ष,आदर्श व्यक्तिमत्व वयाच्या ६६ व्या वर्षी २३ मे २०१२ रोजी स्वर्गवाशी झाले. त्यांच्या पवित्र स्मृतीदिनानिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन.