नुकत्याच देहू येथे उभारलेल्या स्वागत कमानीवर संत तुकाराम महाराजांच्या सोबतच्या १३ संतांच्या मूर्ती लावल्या आहेत. मात्र ज्या संतांनी संत तुकाराम महाराज यांचे साहित्य लिहिले ते तेली समाजाची अस्मिता, आराध्यदैवत संत संताजी जगनाडे महाराज यांची मूर्ती टाळल्यामुळे तेली समाजात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, देहू संस्थानने ही चूक दुरुस्त करावी, अशी मागणी भीमराव इंगळे यांनी देहू संस्थानकडे केली आहे.
त्यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले, की संताजी महाराजांमुळेच जगद्गुरु तुकाराम महाराजांची तुकाराम गाथा, अभंग वगैरे आज जगासमोर आले. अशा संताला यातूनच वगळून इतिहास संपवण्याचा हा प्रयत्न असून, प्रथमतः या संस्थानला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली आहे. दरम्यान हजारोंनी या कार्यक्रमाला हजेरी लावताना या प्रकाराबद्दल आवाज उठवला नाही. ज्या रामेश्वर भटाने जगद्गुरु तुकाराम महाराजांचे साहित्य इंद्रायणीत बुडवले त्याचे स्मरणचित्र संस्थान दिमाखाने रेखाटते, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती? यापेक्षाही भयानक वास्तव म्हणजे संताजी महाराज हस्तलिखितही देहू संस्थानने राऊत यांच्याकडून घेतले आणि आता गहाळ झाल्याचे सांगण्यात येत आहे. तेली समाजबांधवांनी संताजी महाराजांमुळे 'तुकाराम गाथा जगासमोर आल्याचा इतिहासच गायब होण्याच्या मार्गावर आहे, यासाठी समाजबांधवांनी जागरूक होणे गरजेचे आहे, असेही आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले आहे.