धुळे - तेली समाजातील मार्केट यार्ड परिसरातील स्वामीनारायण सोसायटी मधील युवक स्व. पवन सुदाम चौधरी यांचे मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथे अपघाती निधन झाले होते.अपघाती निधन झाल्यानंतर वसुधारा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक श्री व्ही.जी. पाटील साहेब यांच्याकडे खान्देश तेली समाज मंडळाने सतत पाठपुरावा करून मदत मिळवून दिली. स्व.पवन चौधरी यांचे लहान भावास नोकरी व रुपये सोळा लाख मदत मिळवून देण्यासाठी मंडळाने पाठपुरावा केला होता.
स्व. पवन याची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. निधन झाले त्या दिवसापासून आठ दिवसावरच त्याचा विवाह होणार होता त्यामुळे संपूर्ण परिसर व तेली समाजामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्यांची हालाखीची परिस्थिती पाहून खान्देश तेली समाज मंडळाच्या प्रतिनिधींनी वसुधारा डेअरीचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री पाटील साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांना काही मदत करता येईल का ? याबाबत चर्चा केली होती.
श्री. पाटील साहेब यांनी सकारात्मक निर्णय घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वांनी सहकार्य करून स्व.पवन यांचे कुटुंबास रुपये सोळा लाखाची भरघोस आर्थिक मदत तसेच लहान भावास त्याच डेअरी मध्ये नोकरी देऊन सहकार्य केले. त्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल श्री पाटील साहेब यांचे व सर्व सहकारीं चे आज खान्देश तेली समाज मंडळाच्या शिष्टमंडळाने वसुधारा डेअरी,बिलाडी रोड, धुळे या ठिकाणी जाऊन त्यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष कैलास आधार चौधरी, सचिव रवींद्र जयराम चौधरी, कार्याध्यक्ष मनोज मधुकर चौधरी, धुळे शहराध्यक्ष राजेंद्र भटू चौधरी, शहर उपाध्यक्ष चंद्रकांत श्रीराम चौधरी,सल्लागार भाऊसाहेब चौधरी वरखेडी, महिला आघाडीचे अध्यक्ष सौ. मालती सुनील चौधरी, सचिव सौ. सविता प्रताप चौधरी, सल्लागार प्रताप चौधरी चौधरी व पदाधिकारी उपस्थित होते.