नगर - विद्यार्थ्यांना शिक्षण घेतांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये यासाठी तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने विविध उपक्रम राबविले जात आहे. त्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. आजचे विद्यार्थी हुशार व कष्टाळू आहेत, शैक्षणिक साहित्यावाचून शिक्षणात खंड पडू नये, कोणतीही अडचण राहू नये याकडे ट्रस्ट लक्ष देत असते. त्याचप्रमाणे गुणवंतांचा सत्कार करुन त्यांना प्रोत्साहन दिले जाते. उच्च शिक्षण हे महाग होत असतांना समाजातील प्रत्येक विद्यार्थ्यांना ते मिळावे यासाठी
आर्थिक मदत करत त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी ट्रस्ट घेत आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थीही यशस्वी होत पालकांबरोबर ट्रस्टचे नाव उंचावत आहेत, असे प्रतिपादन तिळवण तेली समाज ट्रस्टचे सचिव प्रसाद शिंदे यांनी केले.
तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने संताजी महाराज शैक्षणिक योजनेंतर्गत कु. साक्षी चोथे हिच्या इंजिनिअरिंग शिक्षणासाठी मदतीचा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष सागर काळे, उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, सचिव प्रसाद शिंदे, खजिनदार प्रकाश सँदर, विश्वस्त गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, सौ. निता लोखंडे, शोभना धारक, प्रमोद डोळसे आदि उपस्थित होते.
याप्रसंगी अध्यक्ष सागर काळे म्हणाले, समाजाच्या प्रत्येक घटकाचा विकास व्हावा, त्यांनी स्वावलंबी बनावे, यासाठी ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमास अनेकांचे सहकार्य मिळत असल्याने अनेकांचा त्याचा फायदा होत आहे. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्यांचा हक्क असल्याने गुणवंतांच्या पाठिशी ट्रस्ट नेहमीच उमे असल्याचे सांगितले.
यावेळी कु. साक्षी चोथे हीने मनोगतातून ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक करुन ट्रस्टच्या कार्यात पुढील काळात आपणही योगदान देऊ, असे सांगितले. प्रास्तविकात मनोज क्षीरसागर यांनी ट्रस्टच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचालन निता लोखंडे यांनी केले तर आभार शशिकांत देवकर यांनी मानले.