प्रस्थापित अन्यायाविरुद्ध संघर्ष करणार्या संत तुकारामाचा पट्टशिष्य असलेला संतू ऊर्फ संताजी जगनाडे यांचा जन्म ९ डिसेंबर १६२४ रोजी चाकण, जि. पुणे येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव सोनवणे असून जगनाडे या टोपणनावाने ते जास्त प्रसिद्ध झाले. वडील विठोबा आणि आई मथाबाई यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. संताजीला शिक्षणासाठी घरीच व्यवस्था करावी लागली. लेखन-वाचन-अंकगणित याचेही व्यावहारिक शिक्षण संताजीला घरीच मिळाले. संताजीचे लग्न तत्कालीन रीतरिवाजाप्रमाणे वयाच्या ११ व्या वर्षी खेडच्या कहाने घराण्यातील सुंदर स्वरूपवान सहा-सात वर्षांच्या यमुनाबाईसोबत १६३५ मध्ये झाले. घर बघताना संताजींच्या मनात विषम समाजरचनेबद्दल चीड निर्माण होत होती. पण त्यांना मार्गच सापडत नव्हता. चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात १६४० ला तुकारामांचे कीर्तन असल्याची माहिती संताजीला मिळताच अत्यानंदाने संताजी कीर्तनाला गेले. तुकारामाचे क्रांतिकारी-विद्रोही विचार ऐकून संताजी प्रभावित झाले. त्यांच्या विचारांना दिशा दाखवणारा मार्गदर्शक तुकारामाच्या रूपात मिळाला आणि तुकारामांसोबतच कार्य करायचा संताजींनी निर्धार केला. वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी घरच्यांचा निरोप घेऊन तुकारामांसोबत दुसºया गावाकडे प्रयाण केले. बहुजन समाजाचे दु:ख बघून तुकाराम महाराज म्हणतात.
‘बुडती हे जन, न देखवे डोळा। म्हणोनी कळवळा, येत असे॥
भीत नाही आता, अपुल्या मरणा॥ पर पीडे चित्त, दु:खी होते॥
सत्य असत्याशी मन केले ग्वाही। मानियेले नाही बहुमता॥
तुकारामाचे सामाजिक उत्थानाचे कार्य बघून उच्चवर्णीयांचा अहंकार जागा झाला. त्यांनी तुकारामांवर धर्मद्रोह, वर्णद्रोह, ब्राह्मणद्रोहाचा आरोप केला. तुकाराम शूद्र आहे. संस्कृतातील धर्मतत्त्वज्ञान मराठीतून सांगणे हे ब्राह्मण जातीवर आक्रमण आहे. भोळ्या-भाबड्या जनतेला ब्राह्मणांविरुद्ध तुकाराम बिघडवीत आहे. ब्रह्मदेवाने ब्राह्मणांसाठी सांगितलेले तत्त्वज्ञान हा शूद्रांना मराठीतून सांगतो. यासारखा अधर्म नाही. ब्राह्मणांचा शत्रू तो धर्मशत्रूच असतो. तुकारामाचे कुणीच काही ऐकून न घेता त्याची सर्व संपत्ती जप्त करावी व तुकारामाने लिहिलेले अभंग इंद्रायणी डोहात बुडवून नष्ट करावे, अशी शिक्षा तुकारामास देण्यात यावी, असे रामेश्वरभटाने सांगितले.
तुकाराम महाराजांनी रचलेल्या अभंगाची गाथा इंद्रायणीत बुडविण्यात आली. हा तुकारामांसोबतच संताजीवरही फार मोठा आघात होता. अभंगाच्या वह्या गेल्याने तुकाराम उपोषणाला बसले. त्यांची ही अवस्था बघून संताजींनी अभंगगाथा तयार करण्याचे ठरविले. सतत १३ दिवस मावळप्रांत घराघरातून पिंजून काढला. लोकामुखी असलेले अभंग जमा केले. जात्यावरील बायांची गाणी जमा केली. जमा झालेले सर्व अभंगाची नीट रचना करून वह्यांची बांधणी केली आणि इंद्रायणी नदीने तुकारामाची अभंगगाथा परत केली, अशी माहिती तुकाराम महाराजांना दिली. गाथा दिसताच १३ व्या दिवशी तुकाराम महाराजांनी उपवास सोडला. तुकाराम महाराजांचे प्राण आपल्या बुद्धचातुर्याने वाचविणारे संताजी स्वत:ही अमर झाले आणि संताजीने पुनर्लिखित केलेल्या तुकारामाच्या अभंगगाथेमुळे तुकाराम महाराज अजरामर झाले. तुकाराम महाराजांचे ‘सदेह वैकुंठगमन’ १६४९ ला झाले त्यावेळी त्यांचे वय ४१ वर्षांचे व संताजीचे २५ वर्षांचे होते. तुकाराम महाराजांच्या मृत्यूचा जबरदस्त धक्का संताजींना बसला. तुकाराम महाराजांच्या नंतर सहकारी म्हणून वारंवार भटांचा त्रास संताजीला झाला तरीही तुकारामांचे अभंग व त्यांची भूमिका लोकांत ठेऊन जनजागरणाचे काम करीत होते. वयाच्या ७५ व्या वर्षी संताजींना देवाज्ञा झाली. तो दिवस म्हणजे २० डिसेंबर १६९९ चा होय. संताजी महाराज त्यावेळचे संत हे माळकरी, टाळकरी नसून प्रस्थापत समाजव्यवस्थेवर ‘वार’ करणारे खरे वारकरी होते. तुकारामांचा विचारांना जिवंत ठेवण्याचे महान कार्य संताजींनीकेले. संताजी महाराजांनी ‘तैलसिंधू’ व ‘शंकरदीपिका’ नावाचे ग्रंथ लिहिले. संताजी महाराजांनी ‘तैलसिंधु’ नावाच्या ग्रंथात व्यवसायाची माहिती दिलेली आहे. सतत ७५ वर्षेपर्यंत अविरत कार्य करणाºया लढवय्या संताजीला तेली समाज म्हणूनच दैवत मानते. तेली समाजात एवढा त्यागी, बहादूर, नि:स्वार्थी, जनतेवर नि:स्सीम प्रेम करणारा आणि तुकारामासारख्या द्रष्ट्या माणसाला सर्व परिस्थितीत साथ देणारा संताजी तेली समाजात जन्माला आला हे तेली समाजाचे भाग्य आहे. म्हणूनच तेली समाज संताजीला दैवत मानतो.