नगर - शासन निर्णयानुसार राज्यात सामाजिक सलोखा व सौहार्द निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मता वृद्धींगत होण्याच्या दृष्टीने गावांची, वस्त्यांची व रस्त्यांची जातीवाचक नावे बदलून महापुरुषांची व लोकशाही मुल्यांशी निगडीत नावे देण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार महानगरपालिकेने जाहीर केल्यानुसार 'तेलीखुंट' परिसराचे नाव बदलून 'श्री संत संताजी महाराज पथ' करण्यात यावे, या मागणीचे निवेदन तिळवण तेली समाज ट्रस्टच्यावतीने मनपा आयुक्त पंकज जावळे यांना देण्यात आले. याप्रसंगी ट्रस्टचे सचिव प्रसाद शिंदे, विश्वस्त शशिकांत देवकर, दत्तात्रय ढवळे, दिपक भागवत, राजू देशमाने आदि उपस्थित होते.
यावेळी प्रसाद शिंदे यांनी सांगितले, नगर शहरातील तेलीखुंट या परिसरात पूर्वीपासून तेली समाज बांधवांचे बहुसंख्येने वास्तव्यास असून, त्या ठिकाणी तेल घाणी व्यवसाय आहे, त्यामुळे या परिसरास पूर्वीपासून तेलीखुंट नावाने संबोधित करण्यात येत आहे. परंतु आता ते बदलून 'श्री संत संताजी महाराज पथ' करण्यात यावे.
जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची गाथा लेखन व जतन करणारे संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे तेली समाजाचे श्रद्धास्थान व दैवत आहे. त्यांच्या कार्याचा वारसा जनमाणसात वृद्धींगत होण्यासाठी त्यांचे नाव तेलीखुंट परिसरास देण्यात यावे. दाळमंडई - तेलीखुंट येथे तिळवण तेली समाज ट्रस्टच्या जागेत संत संताजी महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दरवर्षी ८ डिसेंबर रोजी श्री संताजी महाराज जयंती उत्सव व पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येतो. तसेच महाराष्ट्र शासनाने दि. ८ डिसेंबर या दिवशी संताजी महाराज जयंती कार्यक्रम सर्व शासकीय कार्यालयात साजरा करण्याबाबत परिपत्रक निर्गमित केलेले आहे. त्या अनुषंगाने आम्ही तिळवण तेली समाज ट्रस्ट व सर्व तिहवण तेली समाज बांधवांच्यावतीने 'तेलीखुंट' हे नाव बदलून 'श्री संत संताजी महाराज पथ' असे नामकरण करण्यात यावे, अशी विनंती केली असल्याचे श्री. शिंदे यांनी सांगितले. या निवेदनावर अध्यक्ष सागर काळे, उपाध्यक्ष मनोज क्षीरसागर, सचिव प्रसाद शिंदे, खजिनदार, प्रकाश सैंदर, विश्वस्त गोकूळ कोटकर, दत्तात्रय डोळसे, शशिकांत देवकर, निता लोखंडे, शोभना धारक आदिंच्या सह्या आहेत.