कन्नड : कन्नड येथे संताजी महाराजांची ३९९ वी जयंती शिवना नदी तीरावरील महादेव मंदिर परिसरात प्रदेश तेली महासंघ, संताजी महाराज ट्रस्ट व तिळवण तेली समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर, सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमात राजकीय पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी 'गरुडझेप'चे सुरेश सोनवणे, आमदार उदयसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष स्वाती कोल्हे, संजना जाधव, उद्योजक मनोज पवार, महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश कार्डिले, डॉ. रवींद्र काळे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात २३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. दत्ताजी भाले रक्तपेढीच्या वतीने संकलन करण्यात आले.
या वेळी जगनाडे महाराजाच्या प्रतिमेस उपस्थितीत पुष्पहार अपर्ण करून अभिवादन केले. तालुका तेली महासंघाच्या वतीने तालुका अध्यक्ष भरत चौधरी यांच्या वतीने कन्नड तालुका तिळवण तेली कुटुंब परिचय पुस्तिकेचे सुधारित आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. गुरुवारी सकाळी शनी मंदिर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली. सूत्रसंचालन संतोष बागुल यांनी केले, तर आभार योगेश खंडागळे यांनी मानले. कन्नड प्रदेश तेली महासंघ, संताजी महाराज ट्रस्ट व सकल तिळवण तेली समाजाच्या वतीने कार्यक्रमासाठी परिश्रम घेण्यात आले.