'जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे शिष्य तथा तेली समाजाचे आराध्य संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 398 व्या जयंतीचे तालूक्यातील घाटमाथा परिसरात मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले. अभंग व किर्तनाच्या माध्यमातून ज्ञान, कर्म व भक्तीची शिकवण देणारे संत संताजी जगनाडे महाराज महाराष्ट्रातील संत परंपरेतील महान विभूती. संत संताजी जगनाडे यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांना आपले गुरु मानले होते. विलक्षण प्रतिभा लाभलेल्या संताजी यांनी तूकाराम गाथेचे लेखन करण्याचे महान कार्य केले. तसेच शंकर दीपिका, घाण्याचे अभंग, योगाची वाट, निर्गुणाचं लावण्य, तैलसिंधू, पाचरीचे अभंग यासारख्या ग्रंथाचे लेखनही त्यांनी केले.
तेली समाजाचे आराध्य संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या 398 व्या जयंतीनिमित्ताने तालूक्यातील घाटमाथा परिसरातील जातेगांव येथे तमाम समाज बांधवांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामपालिका कार्यालयात संत संताजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. संत संताजी जगनाडे महाराज जयंती उत्सव समितीकडून टाळ मृदूंगाच्या गजरात भव्य दिंडी व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी संताजी महाराजांच्या नामाचा एकच जयघोष झाला. आई लॉन्स येथे विविध मान्यवर तथा समाज बांधवांनी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तालूका यूवा सेना अध्यक्ष गुलाब पाटील, कैलास तुपे, ग्रामपालिका सदस्य संदिप पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा तैलिक महासंघ तालूका यूवा अध्यक्ष संतोष गायकवाड, उत्सव समिती अध्यक्ष रमेश व्यवहारे तसेच समस्त पदाधिकारी समाज बांधवांचे मार्गदर्शन यावेळी लाभले. याप्रसंगी | जातेगांव ग्रामपालिका पदाधिकारी, सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच घाटमाथा परिसरातील समस्त तेली समाज बांधवांसह ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.