शिर्डी - देशभरातील तेली समाजाने देशासाठी मोठे योगदान दिलेले असुन समाजातील जाणत्यांनी पुढाकार घेवून पोटजातींमधील रूदी परंपरांना फाटा देवून विवाह संबंध होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध व्यावसायिक आणी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश पन्हाळे यांनी केले. येथे तेली समाज राज्य स्तरीय वधु-वर पालक मेळावा आणि अहमदनगर तेली समाज महासभेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते.
यावेळी अॅड. विक्रांत वाकचौरे, पुष्पा चौधरी, प्रकाश सैदर, बद्रीनाथ लोखंडे, भारत चवरो, भारत साळुंखे, सुधाकर बनसोडे, सुरेश नागले, प्रीती चौधरी आदींसह राज्यातील समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. रमेश पन्हाळे यांनी सांगितले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य समाजासाठी गौरवाची बाब आहे. राज्यातही चंद्रशेखर बावनकुळे, जयदत्त क्षिरसागर, विजय वडेट्टीवार यांच्यासारखे नेते समाजाने दिलेले असून त्यांचेही काम विविध क्षेत्रात वाखाणण्यासारखे आहे.
तेली समाजातील बांधवांनी देशसेवेबरोबच समाजाच्या उन्नतीसाठी एकत्र येण्याची गरज असून राज्यातील तेली समाजाने वधूवर पालकांचे मेळावे करताना एकाच दिवशी एकच वधु वर मेळावा होईल, याची दक्षता घेतली पाहिजे. समाजातील २८ पोटजातींमधील विवाह संबंध निर्माण होण्यासाठी रूदी परंपरांना फाटा देण्याची गरज आहे. त्यासाठी समाजातील सर्व जाणत्या लोकांनी पुढाकार घेतला पाहिजे. साईबाबांच्या नगरीत होत असलेला हा मेळावा राज्यातील समाजबांधवांसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार
साईबाबा सेवा रत्न पुरस्कार विद्याताई रतन चौधरी (राहाता), डॉ. स्वप्निल माने (राहुरी), विठ्ठल रुख्मीनी ट्रस्ट, शिर्डी, भारत चावरे (मुंबई), भारत साळुंखे (बेलापूर), साईपालखी निवारा (निघोज), संताजी महाराज जगनाडे समाजरत्न पुरस्कार डॉ. अमोल वालझाडे (संगमनेर) जगन्नाथ लुटे (शिर्डी), जनार्दन वालझाडे (शिमलापुर), अनिल बनसोडे (दाढ़), तिलवन तेली समाज ट्रस्ट नगर यांना गौरवण्यात आले.