पवनी: संत हे कुणा एकट्याचे नसतात. ते सर्वांचेच असतात. संत हे उत्कृष्ट प्रबोधनकार असतात. संत जगनाडे महाराजांनी समाजामध्ये बदल घडवून आणला, असे प्रतिपादन विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय उपाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे यांनी केले.
श्री संताजी महाराज जयंतीनिमित्त पवनी येथील गांधी भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
उद्घाटक म्हणून नागपूर विद्यापीठ विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. दत्तात्रय वाटमोडे तर अतिथी म्हणून विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेव हटवार, सेवानिवृत्त कृषी अधिकारी विष्णू तलमले, श्री संताजी स्नेही सेवा समितीचे अध्यक्ष तुळशीराम बिलवणे, संजय घुगुसकर, नागपूर विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, सेवानिवृत्त अभियंता राजकुमार कृपाण, राम जुमळे, पप्पू रेवतकर उपस्थित होते. समितीचे सचिव उमाजी देशमुख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नवनिर्वाचित पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष गंगाधर जीभकाटे, सुभाष वाडीभस्मे, डॉ. दत्तात्रय वाटमोडे, प्रा. डॉ. नामदेव हटवार, जगदीश वैद्य, काशीराम बिलवणे, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. संचालन विशाल बोरकर यांनी तर आभार किशोर पंचभाई यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सेवा समितीचे अध्यक्ष तुळशीराम बिलवणे उपाध्यक्ष जीभ काटे आदींनी सहकार्य केले.