वडगाव मावळ : शिंदे फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील संत संताजी महाराज जगनाडे यांच्या समाधिस्थळ मंदिर विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्यात आली. दरम्यान, माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी यासाठी भरीव निधीची मागणी केली होती. सरकारने निधी जाहीर केल्याने भेगडे यांच्या मागणीला यश आल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या आणि शिंदे सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे वाचन केले. या वेळी फडणवीसांनी अर्थसंकल्पातून राज्याच्या विविध क्षेत्रासाठी अनेक तरतुदी आणि अनेक नव्या योजनांच्या घोषणा केल्या.
मावळ तालुक्यासाठी या अर्थसंकल्पातून काय मिळणार, याकडे सर्वच तालुकावासीयांचे लक्ष लागले होते. अखेर शिंदे- फडणवीस सरकारने मावळ तालुक्यातील एका विशेष कार्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयाची घोषणा केली. अर्थमंत्री फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडतांना राज्यातीस अनेक भागातील महापुरुष आणि संत महात्मे यांच्या समाधी, स्मारक विकासासाठी निधींची तरतूद जाहीर केली.
या वेळी मावळ तालुक्यातील श्री क्षेत्र सुदुंबरे येथील श्री संत जगनाडे महाराज यांच्या समाधिस्थळाच्या मंदिराच्या विकासासाठी देखील सरकारकडून खास २५ कोटी रुपये जाहीर करण्यात आले आहेत. भेगडे यांनी सुदुंबरे तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला भरीव अशी मागणी केली होती. आज महायुती सरकारने निधी मंजूर केल्याबद्दल सरकारचे तालुक्याच्या वतीने जाहीर आभार मानले.
सुदुंबरेतील मंदिर
संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे समाधी मंदिर सुदुंबरे या गावी आहे. संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी चाकण या गावी विठोबा जगनाडे यांच्या घरी झाला होता. आणि शेवटी १८ डिसेंबर १६८९ रोजी सुदुंबरे येथेच त्यांचे निधन झाले. जगनाडे महाराज यांचे सुदुंबरे येथे समाधी मंदिर आहे.