मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) आपसीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे विलेपार्ले येथील पार्ले टिळक शाळेच्या आर्यन रहाटे या विद्यार्थ्यांने रक्ताच्या कर्करोगाशी झुंज देत दहावीच्या परीक्षेत ९६.५ टक्के गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे त्याच्या या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे
विलेपार्ले येथे राहणाऱ्या आर्यन रहाटे याला गतवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी ताप आला. तपासणीनंतर त्याला रक्ताचा कर्करोग झाल्याचे स्पष्ट झाले. आजारामुळे रक्तातील पांढन्या पेशींवर परिणाम होत होता. दुर्धर आजाराशी लढा देत असतानादेखील आर्यनने मोठ्या जिद्दीने दहावीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. आजारपणामुळे त्याला नियमित शाळेत उपस्थिती लावता आली नाही तरीही त्याने कठोर परिश्रम घेत अभ्यास केला. शाळेनेदेखील त्याला मदत केली. दहावीचे तीन पेपर त्याने शाळेतून, तर तीन पेपर सांताक्रुझच्या सूर्या हॉस्पिटलमधून बेडवरून दिले. आलेल्या संकटाशी दोन हात करत. आर्यनने परीक्षेत यश मिळवले.
कोणत्याही विपरीत परिस्थितीत विचलित न होता आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर आपले लक्ष्य साध्य करणे हे आर्यनने जगाला दाखवून दिले आहे. या पार्श्वभूमीवर विलेपार्ले विधानसभा समन्वयक नितीन डिचोलकर आणि अपर्णा उतेकर यांनी लढवय्या आर्यनच्या घरी जाऊन त्याच्या साहसाचे कौतुक केले तसेच या दुर्धर आजारातून आर्यन लवकरात लवकर पूर्णपणे बरा व्हावा अशी प्रार्थना केली.