धामणगाव रेल्वे : राज्यातील संतपरंपरेत मानाचे स्थान असलेले आणि संत तुकारामांच्या महान गाथेचे पुनर्लेखनातून पुनरुज्जीवन करणारे संत जगनाडे महाराज यांच्याविषयी अद्याप पाठ्यपुस्तकांमध्ये धडा नाही वा त्यांच्या नावे कोणतेही विकास मंडळ नाही. शुक्रवारी संत संताजी जगनाडे महाराज यांची जयंती आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या इतिहासाचा प्रचार व प्रसार कधी होणार, असा सवाल निर्माण होत आहे. तेली समाजाचे दैवत म्हणूनच संत जगनाडे महाराजांची ओळख आहे.. तथापि, संत संताजी जगनाडे महाराज १६ वर्षांचे असताना त्यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांसोबत चाकणच्या चक्रेश्वर मंदिरात कीर्तनाप्रसंगी भेट घेतली आणि त्यांच्या संगतीत राहून मुख्य टाळकरी बनले. संत तुकारामांच्या मुखातून निघणारे अभंग संताजी आपल्या लेखणीतून टिपू लागले संताजी गोधन चारत असताना भंडारा डोंगरावर संत तुकारामांसोबत फावल्या वेळात अभंगरचना करीत असत.
संत तुकारामांच्या समाजशील, विधायक अभंगरचना पचनी न पडल्याने समकालीन समाजकंटकांनी ईष्येपोटी त्यांची गाथा इंद्रायणी नदीत बुडविली. अशावेळी संताजी महाराजांनी स्वतः कंठस्थ तसेच लोकांमध्ये रुजलेले अभंग गोळा करून १३ दिवसांत अत्यंत परिश्रमाने हस्तलिखित गाथा तयार करून संत तुकारामांच्या स्वाधीन केली होती.
समतेचे दर्शन देणारे संत जगनाडे महाराज यांच्यावर केवळ पोस्टाचे तिकीट काढण्यात आले. त्यांचे समाधिस्थळ अद्यापही दुर्लक्षित आहे पाठ्यपुस्तकात कोणताही घडा आतापर्यंत आला नाही. तसेच त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात शासनाने पुढाकार घेतला नसल्याची खंत सर्व शाखीय तेली समाज संघटन नागपूर विभाग समितीचे अध्यक्ष विलास बुटले यांनी व्यक्त केली.