अहमदनगर- संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या शिकवणीनुसार तेली समाजाची वाटचाल सुरू आहे. प्रत्येकाने एकमेकांशी आपुलकीने व प्रेमाने वागावे. श्री संताजी महाराजांनी जगद्गुरु संत तुकोबाराय यांची बुडालेली गाथा पुन्हा तंतोतंत लेखन करून समाजापुढे आणली. जगदगुरु संत तुकाराम महाराजांची गाथा आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवते. संतांच्या विचारांचे अनुकरण करून समाज सुसंस्कृत झाला आहे. श्री संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले आहे.
संताजी महाराज चौक, तेलीखुंट येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त लाडू वाटप करण्यात आले. तसेच छत्तीसगड येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत तेली समाजाचे १२ आमदार निवडून आल्याबद्दल तिळवण तेली समाज बांधवांकडून जल्लोष करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नेत्रदूत पुरस्कार जाहीर केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अमरधाम येथील वैकुंठ गमन मंदिर येथे साफसफाई करून संतश्रेष्ठ श्री संताजी जगनाडे महाराज व जगदुरु संत तुकोबाराय यांचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे, किशोर काळे, परसराम सेंदर, हभप भीमराज कातोरे महाराज, अशोक शेठ जोशी, नंदुभाऊ गुंदेचा, प्रमोद बाळके, देविदास साळुंके, श्रीराम हजारे आदी उपस्थित होते. किशोर काळे म्हणाले, सामाजिक कार्यकर्ते नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांनी शिबिराच्या माध्यमातून तीन लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया केले आहेत. जालिंदर बोरुडे हे नगरचे भूषण आहेत. जालिंदर बोरुडे यांचे कार्याचा सर्व तेली समाज बांधवांना अभिमान आहे. सूत्रसंचालन श्रीराम हजारे यांनी केले प्रमोद वाळके यांनी आभार मानले.