गडचिरोली : भारत ही संतांची भूमी असून प्रत्येक समाजामध्ये संत आहेत. त्या संतांचे विचार आत्मसात केल्यास समाजात परिवर्तन शक्य असल्याचे प्रतिपादन छत्रपती संभाजी नगरचे (औरंगाबाद) संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विजय गवळी यांनी केले.
श्री संत संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव समितीतर्फे सर्वोदय वॉर्डातील श्री संताजी स्मृती प्रतिष्ठानात रविवारी श्रीसंत संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त शोभायात्रा, समाज प्रबोधनपर व्याख्यान, वधू-वर परिचय मेळावा व कीर्तन तसेच गुणवंत विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते 'संताजी महाराजांचे चरित्र, समाजाची दशा व दिशा' या विषयावर मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी प्रसिद्ध साहित्यीक तथा 'संताजी एक योद्धा' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक संजय येरणे तर प्रसिद्ध प्रबोधनकार तथा सप्तखंजिरी वादक वर्धाचे किर्तनकार दीपक महाराज भांडेकर उपस्थित होते.
पुढे प्रा. विजय गवळी म्हणाले, महाराष्ट्राला संत परंपरेचा मोठा इतिहास आहे. संतांनी तत्कालिन अनिष्ट रूढी, परंपरा व अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टीकोन रूजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला आहे. असा अत्यंत विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रूजविणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पोथ्या इंद्रायणी नदीत समाज कंटकांनी बुडविल्या. संत तुकाराम महाराजांचे शिष्य श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांनी गावोगावी फिरून संत तुकाराम महाराजांचे मुखोदगत अभंग पुनश्च लिहून काढले आणि समाजाला जागृत करण्याचे कार्य आयुष्यभर केले. परंतु अजुनही समाज जुन्या रूढी, परंपरा व अंधश्रद्धेच्या जोखंडातून पूर्णतः मुक्त झालेला दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात श्रीसंत जगनाडे महाराज यांच्या जयंती सोहळ्यासारखी जयंती महाराष्ट्रात पाहिली नाही. समाज एकत्र आला तरी प्रबोधन झाले पाहिजे, असे सांगत शेतकरी आत्महत्या केला तर त्या घरची बाई सासू, सासरे व मुलांना सांभाळून डोक्यावर असलेले कर्ज फेडते. त्यामुळे महिलांच्या हाती कारभार दिला तर ते कुटुंब आर्थिक विकासाच्या प्रवाहात येते. मुलांच्या हातात मोबाइल आल्याने मुलांना वाईट मार्गाला लावण्याचे काम आपण करत असल्याचे त्यांनी सांगितले. ज्याला चांगल्याची संगत असते, तो चांगला बनतो तर ज्याला वाईटाची संगत, तो वाईटच होतो. म्हणून चांगल्याची संगत करा व आपण जो पैसा कमवितो, त्या पैशातून १ ते २ टक्के हिस्सा समाजाच्या उत्थानासाठी खर्च करा, असे आवाहन प्रा. विजय गवळी यांनी केले. तर अध्यक्षस्थानावरून बोलताना संजय येरणे यांनी श्रीसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती कार्यक्रमामुळे त्यांच्या विचाराचा प्रवाह वाढत आहे. आपल्या समाजातील संताचे विचार पुढे यावे म्हणून समाजाचा लेखक म्हणून श्री संताजी महाराज यांच्या
कार्यावर लेखन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व संचालन प्रा. राम वासेकर यांनी केले. आभार प्रतिभा खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रभाकर वासेकर, सुरेश भांडेकर, प्रमोद पिपरे, भाग्यवान खोब्रागडे, संतोष खोब्रागडे, गजानन भांडेकर, देवाजी सोनटक्के, रमेश भुरसे, देवानंद कामडी, योगिता पिपरे, घनशाम लाकडे, बाबूराव कोहळे, डी. डी. सोनटक्के, गोपीनाथ चांदेवार, विष्णू कांबळे, राजेश इटनकर, रमेश कांबळे, सुधाकर दुधबावरे, राहुल भांडेकर, आदींसह समाजबांधव, भगिनी, युवक, युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीसंताजी जगनाडे महाराज जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, गडचिरोलीचे आमदार डॉ. देवराव होळी, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. नामदेव किरसान, माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी आदींनी उपस्थिती लावून कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजबांधवांना शुभेच्छा दिल्या.