संत साहित्याने समृद्ध असेल्या महाराष्ट्रात अनेक संतांनी आपल्या प्रगल्भ अमृत विचार वाणीतून समाजच्या उत्थानासाठी मार्गदशन केले आहेत. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत नामदेव यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील संत तुकडोजी महाराजांपर्यंत अशा अनेक संतांनी समाजाच्या उत्थानासाठी आपल्या बौद्धिक विचारांनी संत साहित्याला समृद्ध केले आहे. ह्या साहित्यात एवढी शक्ती आहे की, जर समाजाने व्यवस्थित, ह्याचा अभ्यास केला तर एक समृद्ध समाज निर्माण व्हायला फार वेळ लागणार नाही. आपल्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारावर संतांनी भाष्य केले आहे. - सुहास दुतोंडे, फुलंब्री
नम्रता, अहंकर, मेहनत, सत्य - असत्य, कर्तव्य, ध्यर्य, साहस, मान-अपमान, विजय- पराजय ह्या गोष्टी व्यक्ति विकासासाठी फार महत्वाच्या आहे. यासंदर्भात संतांनी सखोल मार्गदशन केलेले आहे. अशा ह्या संत परंपरेत एक संत असे होऊन गेले, ज्यांनी मैत्रीचा, प्रेमाचा, निष्ठेचा, त्यागाचा संदेश आपल्या शब्दातूनच नाही तर प्रत्यक्ष आपल्या कर्मातून त्यांनी दिला ते संत म्हणजे श्री संत संताजी जगनाडे महाराज.
८ डिसेंबर १६२४ पुणे येथील चाकणमध्ये श्री विठोबा आणी माथाबाई जगनाडे यांचा घरी संताजींचा जन्म झाला. घरी धार्मिक वातावरण असल्याने बालपणापासूनच जगनाडेवर धार्मिक संस्कार होत गेले. घरी तेलाचा व्यवसाय असल्याने त्यांना हिशेब आणि लिहिता वाचता येईल, एवढे शिक्षण झाले होते. पुढे संत संताजी यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला आणी ते प्रपंचात रममाण झाले. त्यानंतर त्यांची भेट संत तुकाराम महाराज यांच्यासोबत झाली. त्याकाळी संत तुकाराम महाराज यांचे कीर्तन चाकण येथे होणार असल्याने संताजीही त्या कीर्तनासाठी उपस्थित होते. ते कीर्तन ऐकल्यानंतर संत तुकाराम महाराज संताजींवर एवढा प्रभाव पडला की, त्यांनी प्रपंच सोडून सन्यास घेण्याचे ठरवले. त्यानंतर तुकाराम महाराजानी संताजींची समजूत काढली आणि प्रपंचात राहून सुद्धा परमार्थ साधता येतो, अशी शिकवण संताजीला दिली. यानंतर संताजींनी संत तुकाराम महारांजाचे शिष्यत्व स्वीकारून ते पुढे त्यांच्या सानिध्यात राहू लागले.
संत तुकाराम महाराज आणि संत संताजी महाराज यांच्यामध्ये एक चांगले मैत्रीचे नाते निर्माण झाले होते. जिथे जिथे संत तुकाराम महाराज कीर्तनाला जायचे त्यांच्यासोबत संताजी महाराज नेहमी असायचे. संत तुकाराम महाराजांना लोकांना उपदेश देण्याचा अधिकार नाही, असा आरोप करत काही धर्म पंडितांनी तुकाराम महाराजांना आपली गाथा पाण्यात बुडविण्याची शिक्षा दिली. तेव्हा संत तुकाराम महाराजांनी आपली गाथा इंद्रायणीला अर्पण केली. यामुळे संत तुकारामांना मोठे दुःख झाले. संत तुकाराम महाराजांची अशी अवस्था संताजींना सहन होत नव्हती. त्यामुळे त्यांनी संत तुकारामांची गाथा कुठल्याही परिस्थितीत पुन्हा उपलब्ध करण्याची शपथ घेतली. संत संताजींना हे माहित होते की, संत तुकाराम महाराजांचे कीर्तनातील अभंग अनेक लोकांना मुखपाठ झाले. त्यामुळे संताजी आपल्या पंचक्रोशीत अनेक ठिकाणी फिरले जिथे जिथे संत तुकाराम महाराज कीर्तन करायचे तिथे तिथे जाऊन त्यांचे अभंग आपल्या वहीत लिहिले. तसेच बरेच अभंग त्यांना मुखपाठ होते. तेही त्यांनी लिहून काढेल आणि अशा चौदा दिवसांच्या अथक परिश्रमातून संत तुकाराम महाराजांची गाथा पुनर्जीवित केली. संत संताजींनी संत तुकाराम महाराजाची गाथा पुनर्जीवित करून मैत्री धर्म निभवला. संत तुकारामांचे साहित्य जिवंत ठेवण्याचे कार्य संताजी महाराजांनी केले आणि संत तुकाराम महाराजांचे विचार सर्व समजाला कळाले. संत संताजी जगनाडे महाराजांनी आपल्या अखेरच्या श्वासापर्यंत गाथा जतन करण्याचे कार्य केले. हे महान कार्य करणाऱ्या संत जगनाडे महारांजानी सुद्धा तैलसिंध, शंकर दीपिका, ह्या सारख्या ग्रंथाचे लेखन केले होते. पण दुर्दैवाने आज उपलब्ध नाहीत; अन्यथा संत जगनाडे महाराजांचे विचार आणखीन चांगल्याप्रकारे समाजाला कळले असते. स्वतःपेक्षा मित्राच्या कार्याला समर्पित असणारे संत संताजी जगनाडे महाराज यांनी शिष्यत्वाची व मैत्रीची आणि त्यागाची शिक्षा आपल्या कर्मातून समाजाला शिकवली. संताजी महाराजांचे कार्य हैं खूप महान होते. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन एक सभ्य समाज निर्माण करणे ही शिकवण समाजाणे घेऊन त्याला पूर्ण करण्याचे प्रयत्न करणे हिच त्यांना दिलेली खरी अदरांजली ठरेल.