चाकण : ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या संत संताजी महाराज जगनाडे जयंती उत्सव विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. चाकण (ता. खेड) येथे संत संताजी महाराज जगनाडे यांचे जन्मस्थान आहे. जयंती उत्सवानिमित्ताने सकाळी साडेसहा वाजता संताजी महाराजांच्या जन्मस्थळी प्रतिमा पूजन करण्यात आले. साडेआठ वाजता रामचंद्र महाराज धाडगे यांचे संताजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रवचन झाले. सकाळी दहा वाजता संताजी नगर येथून मिरवणूक काढण्यात आली. रथावर संताजी महाराज जगनाडे यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. टाळ मृदंगांच्या गजरात भाविकांच्या, वारकऱ्यांच्या नाम घोषात मिरवणूक काढली. चाकण नगर परिषदेच्या कार्यालयात श्री संत संताजी महाराज जगनाडे यांच्या प्रतिमेचे शासकीय पूजन करण्यात आले. उत्सव निमित्त मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट, रोषणाई केली होती. भाविकांसाठी, नागरिकांसाठी अन्नप्रसादाचा कार्यक्रम तिळवण तेली समाज मंदिर बाजारपेठ येथे आयोजित केला होता. मोठ्या प्रमाणात भाविकांनी अन्नप्रसादाचा लाभ घेतला. रात्री नऊ नंतर श्री शनैश्वर भजनी मंडळ चाकण यांचा भजनाचा कार्यक्रम झाला.