हडपसर : श्री संताजी प्रतिष्ठानच्या वतीने श्री संताजी महाराज जगनाडे यांची जयंती संताजी भवन येथे उत्साहात साजरी करण्यात आली. श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेस वधू-वर सूचक केंद्राचे अध्यक्ष सूर्यकांत मेढेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. प्रा. शंकरराव पवार यांनी प्रास्ताविक केले.
थोर संत संताजी जगनाडे महाराजांनी आपल्या कुशाग्र बुद्धिमत्ता आणि उत्तम स्मरणशक्तीच्या आधारे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या गाथा पुनर्लेखनाचे काम केले आणि आपल्या कर्तृत्वदक्षतेचा उत्तम परिचय सर्वांना दिला. या कार्यक्रमास श्री संताजी प्रतिष्ठानचे पदाधिकारी पंडित चौधरी, मधुकर गुलवाडे, किरण किरवे, रवींद्र उबाळे, राजेंद्र किरवे, भगवान खंदारे, वासुदेव गुलवाडे, कमलाकर करपे तसेच सदस्य चंद्रकांत पिंगळे, रामचंद्र वाचकवडे, चंद्रशेखर हाडके, मंगला गुलवाडे, अशोक तांबे, दत्तात्रय ढोले, पायल कोळपे आदी उपस्थित होते. श्री संत संताजी जगनाडे महाराजांचा जन्म ८ डिसेंबर १६२४ रोजी पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील संदुबरे या गावी झाला. त्यांनी भजन-कीर्तनातून समाजप्रबोधन केले असून, त्यांचे अभंगही प्रसिद्ध आहेत.