अमरावती दि. २४ : आजच्या आधुनिक धकाधकीच्या जीवनात युवा पिढीने समाज तसेच परिवारातील अडचणी समजून घेत संस्कृती व संस्कार जपण्याची गरज आहे. शिक्षण हे संस्कार पेक्षा मोठे नाही, ही बाब लक्षात ठेवून युवा पिढीने मार्गक्रमण केल्यास समाजासोबतच परिवार टिकेल आणि परिवार एकसंघ राहील, असे प्रतिपादन खासदार नवनीत राणा यांनी केले.
अमरावती जिल्हा तैलिक समिती व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अमरावती विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वशाखीय तेली समाज उपवर-वधू परिचय मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी समाजाचे मार्गदर्शक शंकरराव हिंगासपुरे होते. खासदार रामदास तडस, खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार अनंत गुढे, अमरावती प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे तैलिक समितीचे अध्यक्ष दिनेश बिजवे, नितीन हटवार, संजय तिरथकर, अनिता तीखिले, अरुण गुल्हाने, अविनाश यशवंते, कैलास गिरोळकर, केशवराव गुल्हाने, ज्ञानेश्वरराव शिरभाते, राजेश हजारे, दीपक गिरोळकर, सुरेश बिजवे आदी उपस्थित होते. तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
संघटनेच्या माध्यमातून तेली समाजाला संघटित करण्याचे काम करीत असून संघटनेच्या पाठपुराव्यामुळे शासन स्तरावर जगनाडे महाराज यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय झाला तसेच सदुंबरे येथील संताजी महाराजांच्या स्मारकासाठी मोठा निधी मिळाला. या पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचे काम करणार असल्याची ग्वाही खासदार रामदास तडस यांनी याप्रसंगी दिली. याप्रसंगी खासदार डॉ. अनिल बोंडे, माजी खासदार अनंत गुढे यांनी मनोगत व्यक्त केले तर उपस्थितांच्या हस्ते संजय हिंगासपुरे व तैलिक समितीच्या सर्व संचालकांचा सत्कार करण्यात आला. या मेळाव्याचे संचालन दिनेश बिजवे यांनी केले तर प्रा केशव गुल्हाने यांनी आभार मानले. मेळाव्यास मोठ्या संख्येने तेली समाज बांधवांची उपस्थिती होती.
उपवर वधू यांचा परिचय असलेल्या कुर्यात सदा मंगलम या पुस्तिकेचे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तिकेत ५०० पेक्षा अधिक मुलामुलींची माहिती आहे. याप्रसंगी मंचावरून १०० पेक्षा जास्त मुला - मुलींनी परिचय दिला. पवर वधू तसेच त्यांचे पालक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.