गडचिरोली : श्री संत जगनाडे महाराज यांच्या विचारांची समाजाला गरज असून विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजविण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन संताजी स्मृती प्रतिष्ठानच्या संचालकांनी केले.
सर्वोदय वॉर्डातील संताजी स्मृती प्रतिष्ठानच्या सभागृहात श्री संताजी वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी संताजी स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोद पिपरे, संचालक प्रभाकर वासेकर, संतोष खोब्रागडे, सुरेश भांडेकर, देवाजी सोनटक्के आदी उपस्थित होते.
यावेळी संताजींच्या विचारांवर आधारित तेली समाजाला मार्गदर्शन करणारी दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. या दिनदर्शिकेच्या माध्यमातून वर्षभर होणाऱ्या विविध धार्मिक, राष्ट्रीय व सामाजिक उत्सवांची माहिती होणार आहे. आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग असले तरी प्रत्येक व्यक्ती आपल्या घरी दिनदर्शिका पाहूनच दिवसाची सुरुवात करीत असतो. त्यामुळे या वार्षिक दिनदर्शिकेच्या माध्यमातून तेली समाजातील बांधवांना योग्य मार्गदर्शन व उपयोग होणार असल्याची माहिती यावेळी मान्यवरांनी दिली.
या कार्यक्रमाला प्रफुल्ल आंबोरकर, संतोष चिलबुले, रमेश कामडी, राहूल भांडेकर, पदम भुरसे, आकाश आंबोरकर, बबलू नैताम, रुद्र समर्थ, मनोज पिपरे, आकाश सोनटक्के, अजय सोमनकर आदी उपस्थित होते.