देहूगाव : श्री संत संताजी महाराज जगनाडे महाराज है संत तुकाराम महाराजांचे चौदा टाळकऱ्यांपैकी एक टाळकरी व शिष्य होते. त्यांच्या समवेत चौदा टाळकऱ्यांपैकी एक असलेले आणखी दुसरे टाळकरी. म्हणजे श्री संत गेवरशेठ वाणी हे होय. या दोन्ही टाळकरी संतांची समाधी सुदुंबरे (ता. मावळ) येथे आहे. संत संताजी महाराज जगनाडे यांचे मूळ गाव चाकण (ता. खेड) हे होते. मात्र ते आपल्या आजोळी राहत होते. उतारवयात ते येथेच स्थायिक होऊन समाधिस्त झाले. सुदुंबरे येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भजन-कीर्तन करीत असत. ते श्री संत तुकाराम महाराजांचे टाळकरी असल्याने ते संत तुकाराम महाराजांच्या समवेत कीर्तनाला असत. ते संत तुकाराम महाराजांचे अभंगाचे लेखन करीत असत.
श्री संत तुकाराम महाराज भंडारा डोंगरावर चिंतनासाठी येत होते. त्यावेळी श्री संताजी महाराज व संत तुकाराम महाराजांनी त्यांना मूठमाती देण्यासाठी येण्याचे वचन दिले, असे सांगितले जाते. संत संताजी महाराज जगनाडे यांच्या मृत्यूनंतर त्यांना समाधीत मूठमाती देत असताना त्यांचे डोके उघडे पडत होते. काही केल्या त्यांचा पूर्ण देह पुरला जात नव्हता. तेव्हा साक्षात वैकुंठाला गेलेले तुकाराम महाराज हे इहलोकी आले व त्यांनी तीन मुठी माती देहावर टाकली. त्यानंतर संपूर्ण देह मातीखाली गाडला गेल्याची माहिती अरुण काळे यांनी दिली. त्याच्या या कार्यामुळे श्री संताजी महाराज जगनाडे यांना वारकरी संप्रदायात वेगळेच महत्त्व आहे.
श्रीक्षेत्र सुदुंबरे येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर हेदेखील श्री संत तुकाराम महाराजांच्या समकाळात बांधलेले असावे, पूर्वी हे मंदिर लाकडी, दगडमाती व विटांचे बांधलेले होते. हे मंदिर मोडकळीस आले होते. यामुळे २०११ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला, सध्या हे मंदिर आधुनिक पद्धतीचे सिमेंट काँक्रीट व स्टीलचा वापर करून बांधलेले आहे. यामध्ये गाभारा कायम ठेवून सभा मंडप, मंदिराचा कळस बांधण्यात आला आहे. श्री संताजी महाराज जगनाडे यांच्या जयंतीला व पुण्यतिथीला येथे भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. तर आषाढी एकादशीला गावातील आबालवृद्ध पांडुरंगाचे दर्शन घेतात.
श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पालखी सोहळ्याला सन १९८० पासून सुरुवात झाली. सुरवातीला पालखी हा सोहळा मोजक्या लोकांबरोबर एका बैलाच्या साहाय्याने बर्फाची चाहतूक करणाऱ्या गाडीत पालखी ठेवून पंढरपूरला नेत असत. सध्या यामध्ये बदल झाला असून वाहनावर पालखी रथ तयार करण्यात आला आहे. पालखीसोबत सात दिड्या चालतात. या सर्व दिंड्यांमध्ये दोन ते अडीच हजार लोक पायी चालत पालखी पंढरपूरला नेत
असतात.
सध्या शासनाने या परिसराचा विकास करण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले. या निधीतून शासनाच्या वतीने विकास कामांची निश्चिती करून विकास केला जाणार असल्याची माहिती श्री संत सताजी महाराज जगनाडे पालखी सोहळा मंडळाचे अरुण काळे यांनी दिली.