- अनुज हुलके
विदर्भ तेली समाज महासंघ स्थापन होण्यापूर्वी तेली समाजाला हीन लेखणाऱ्या काही घटना घडल्या. त्याच्या निषेधाचे तीव्र पडसाद समाजात उमटले. त्यानंतर तेली समाज आणि इतरही काही शेतकरी-कष्टकरी असलेल्या शुद्र जाती आणि स्त्रियांबद्दल हीन लेखन केलेल्या साहित्याची चर्चा होऊ लागली. यात प्रामुख्याने मनुस्मृतीचा उल्लेख होऊ लागला. आणि हिन लेखल्या गेलेल्या समाजात एकप्रकारे अस्मिता जागृत होऊ लागली. मंडल आंदोलनातील अनेक ओबीसी संघटनांनी या बाबत परखड भूमिका घेत, धर्मग्रंथांची उघडपणे चिकित्सा मांडण्याचे धैर्य दाखवले. त्यात तेली समाज आघाडीवर होता. सर्व स्तरातून, तेली समाजाला हीन लेखणाऱ्या घटनांचा, प्रतिवाद होऊ लागला. निर्णयसागर नावाचे कॅलेंडर मुंबईवरुन प्रकाशित होत. या कॅलेंडरमधील १९९२ च्या सप्टेंबर महिन्याच्या मागच्या बाजूला शकुन-अपशकुन मथळ्याखाली ज्योतिर्विद दा. कृ. सोमण लिहतात,
"हातात तेल व पेंड घेतलेला तेली तसेच सोनार, न्हावी, गुरवीन अशी माणसे समोर येणे अशुभ समजावे." प्रयाणकाली मांजर आडवे गेले तर २० पावले मागे यावे, तेली समोरुन येताना दिसला तर ३० पावले मागे यावे आणि विधवा समोर आली तर प्रयाण वर्ज्य करावे.
अशाप्रकारे तेली समाजाला हीन लेखणाऱ्या 'निर्णयसागर ९२' कॅलेंडरची १९९२ ला जानेवारीच्या २० तारखेला होळी केली गेली. १९९३ ला तेली समाजाला हीन लेखणाऱ्या हिंदू धर्मग्रंथ मनुस्मृती व सहदेव भाडळी, या पुस्तकांवर बंदी आणण्यासाठी विदर्भ तेली समाज महासंघाचे ज्येष्ठ नेते मा. रामदास देशकर यांनी महाराष्ट्र शासनाला आत्मदहनाची नोटीस दिली. 'बहुजन समाजाच्या तेली , सोनार , न्हावी व गुरवीन या जातीबद्दल अतिशय हीन आणि बदनामीकारक मजकूर छापणाऱ्या सहदेव भाडळी व सार्थश्री मनुस्मृतीच्या संपादक मुद्रक प्रकाशकांविरूध्द भारतीय दंड विधानाच्या कलम १५३-अ (ब) अन्वये फौजदारी खटला भरण्याची व फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ९५ अन्वये ही प्रकाशने जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा नगरविकासमंत्री श्री. अरूण गुजराती यांनी विधानसभेत केली .
आ. जयदत्त क्षीरसागर, लक्ष्मणराव ढोबळे, केशवराव धोंडगे प्रभृती २६ आमदारांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्र्यांनी ही माहिती दिली. या लक्षवेधीवर सत्तारूढ आणि विरोधी सदस्यांनी अतिशय तीव्र आणि संतप्त भावना व्यक्त केल्या. गोपीनाथ मुंडे, मदन बाफना, दिलीप वळसे पाटील, वल्लभ बेनके, हशु अडवाणी, लीलाधर डाके, नेताजी राजगडकर, विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेंमुर्डे यांनी याप्रकरणी विशेष लक्ष घातले होते,
या लिखाणावर बंदी न आणल्यास तेली समाज समन्वय महासंघाच्या सचिवांनी नागपुरातील डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ३०-१२- ९३ रोजी आत्मदहन करू असे पत्र शासनाला दिले होते. त्याचा उल्लेखही लक्षवेधी सूचनेत करण्यात आला होता.(पृ.४५,तेली समाजाची दशा आणि दिशा,ले. मधुकर वाघमारे) एका पंधरवड्यात मा. रामदास देशकर यांच्या आत्मदहन नोटीसीमुळे २६ आमदारांच्या लक्षवेधी सूचनेवरून 'मनुस्मृती व सहदेव भाडळी पुस्तकावर बंदी,' याप्रकारचा विधानसभेचा ऐतिहासिक निर्णय झाला. दुसऱ्या दिवशी मनुस्मृती ग्रंथाची जवाहर विद्यार्थी गृह नागपूर येथे हजारोंच्या उपस्थितीत होळी करण्यात आली.
मनुस्मृती हा ग्रंथ नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. जातीव्यवस्था समर्थक कौशल्याने, कसोशीने त्या ग्रंथातील मजकूर समाजमनावर बिंबवून उच्चजातवर्चस्व कायम राखत आले आहेत. मनुस्मृतीच्या समर्थकांची संस्कृती या देशात मनुची व्यवस्था अर्थात शूद्रातिशूद्रांची गुलामी कायम ठेवण्यासाठी फार प्रयत्नशील आहे. त्या व्यवस्थेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी त्यांच्याकडे स्वयंसेवक आहेत. दांभिक बापू, बाबा, साधू, साध्वी, माता, अम्मा, महाराज, पंडित आहेत. प्रसार माध्यमे आहेत, या देशातील मंदिरांची मुखत्यारी त्यांच्याकडे आहे. धार्मिक संस्थांना मिळणारे सोनंनाण्याचे दान, बक्षिसे, चल-अचल संपत्ती यांच्या माध्यमातून उभी झालेली मंदिरांची गडगंज मालमत्ता त्यांच्या मुठीत आहे. त्या साधनसंपत्तीचा वापर धर्मांध शक्तीच्या सशक्तीकरणासाठी होतो,असा कितीही टाहो फोडला तरी ते जुमानत नाही. या देशात शिक्षण, शेती, दारिद्र्य, बेरोजगारी, महागाई अशा कितीतरी समस्या आहेत. देवालयाच्या संपत्तीचे राष्ट्रीयीकरण करुन, शिक्षण, शेती, आरोग्य इ.वरील आर्थिक तरतुदीत भर पडू शकते या मताला मनुचा मासा म्हणतात त्यांनी मातीत घातले. ती संपत्ती मनुची व्यवस्था जिवंत ठेवण्यासाठी राबणारे स्वयंसेवक, सनातन संस्था, राजकारण-धर्मकारण, यासाठी वापरले जाते. शुद्रातिशुद्रांना मनुस्मृतीच्या निर्देशानुसार संपत्तीचा अधिकार नाही, म्हणजे त्याचेच काटेकोर पालन नव्हे का? मनुस्मृतीच्या अनेक ओव्या माणसाला पशुपेक्षाही नीच मानणाऱ्या आहेत, अमानुष वागणूकीची दंडसंहिता आहे. जातीभेद, स्त्रीदास्य, शूद्रातिशूद्रांची गुलामी, अस्पृश्यता ह्यांचा मूलाधार मनुस्मृती आहे. म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन करून सर्व प्रकारच्या विषमतामूलक तत्वांना तिलांजली दिली.
आज तेली समाज अनेक क्षेत्रात प्रगती पथावर आहे. स्वातंत्र्यानंतर नव्या घटनेनुसार समता, स्वातंत्र्य, बंधुता,व्यवसाय- शिक्षणाची संधी, लोककल्याणकारी योजना, लोकशाही मूल्ये,आधुनिकीकरण यामुळे समाज बदलत आहे.तेली समाजाला यामुळे खूप लाभ झाला.अनेकांना तेली समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी माहीत नाही. ती अपमानास्पद दशा आता नकोशी वाटते. आता कशाला जुने मुडदे उकरून काढायचे? आता समाजात विषमता राहिलेली नाही, अशा भावना त्यामागे असतात. काही राजकीय पक्षाची भावंडं एकीकडे तेली समाजाची गठ्ठा मते झोळीत पाडून, मनुस्मृतीवर आधारित विचारांच्या पक्ष, संघटनांच्या पालखीचे भोई बनून मिळवलेले दुय्यम मोठेपण मिरवत असतात. त्यामुळे कसायाच्या दावणीला बकरा नेऊन बांधल्यासमान समाजाची अवस्था होते. ज्यांनी समाजाला जनावरांपेक्षाही नीच ठरवले, त्यांच्या ओंजळीने पाणी पिणे म्हणजे आत्मघातकीपणाच नव्हे का? ही गुलाम मानसिकता बदलणे जरुरीचे आहे, यासाठीचा पवित्रा म्हणजे गुलामी लादणारी मनुस्मृती धिक्कारणे होय. तेली समाजाने मनुस्मृतीचे दहन करणे ही एक घटना ऐतिहासिक ठरते. मनुस्मृती दहनामुळे तेली समाजाच्या मागासपणाची चर्चा झाली. समाजातील जाणती भावंडं तेली समाजाचे मागासलेपण, दुय्यम स्थान घालवण्यासाठी परिवर्तनाच्या दिशेने समाजाला कसे नेता येईल? यासंबंधी गांभिर्याने विचार करू लागले. तेली समाज ओबीसी प्रवर्गात मोडत असल्याने ओबीसी आरक्षणाच्या लढाईत तेली समाजाचा सहभाग वाढत गेला. मनुस्मृती दहन या घटनेनंतर विदर्भ तेली समाज महासंघाचे कार्य खूप वेगाने विदर्भातील कानाकोपऱ्यात पसरू लागले. तेली समाजात एक प्रकारे अस्मिता जागृत होऊन, राजकीय शैक्षणिक, सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रात आगेकूच झालेली दिसून येईल. तेली समाजाला पशुपेक्षाही हीन समजणाऱ्या मनुस्मृतीचे दहन करुन तेली समाजाला आत्मभान दिले. समाजमनावर भेदाभेदाचे विषमतेचे संस्कार खोलवर रुजलेले असल्याने ही लढाई निरंतर चालू ठेवावी लागणार आहे, अनेकदा मनुस्मृतीचे दहन करुन, त्या घटनांची कारणमीमांसा करून, स्मरण करून हा लढा जिवंत ठेवणे अनिवार्य आहे.
- अनुज हुलके