संतांचे कार्य हे जनकल्याणसाठी व धर्मासाठी समर्पित असते. संतांची पूजा करणे म्हणजे ईश्वराचीच पूजा करणे होय. संतांना जातीपातीच्या बंधनामध्ये बांधणे योग्य नाही.
संत संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित राजे छत्रपती सांस्कृतिक व्यासपीठ मुकुंदवाडी येथे ह.भ.प. संगिताताई काजळे यांच्या पुढाकारातून ह.भ.प. देविदास महाराज मिसाळ यांच्या भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, संताजी महाराज हे तुकोबारायांचे अभंग लिहून काढत असे. संताजी महाराजांचे अक्षर हे अगदी मोत्या सारखं होतं. म्हणून इकडे तुकोबारायांनी अभंगांची सुरुवात केली की तिकडे संताजी महाराजांनी लिहायला सुरूवात करायची.
सगळं असंच लिहिता लिहिता क्रम चालू होता. एकदा संताजी महाराज व तुकोबाराय हे नदीकाठी फिरत असतांना तुकोबारायांच्या लक्षात आलं की संताजी महाराजांचा चेहरा जरा पडलेला दिसतोय. चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे तेज नाही. संताजी महाराजांनी मग विचारल्यावर सांगितले की, लोकांच्या निंदेचं करायचं काय हा मला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही ते समजून घेता. तुम्हाला त्याचे आकलन झालेले आहे. तुम्हाला ते कळतंय. मला अजुन ही कळलेलं नाही. म्हणून निंदकाच्या तोंडाला आपण हात लावू शकत नाही मात्र त्याचा मला त्रास झाल्या शिवाय रहात नाही. तेव्हा तुकोबाराय म्हणतात, की आपण आपले जनकल्याण चे कार्य करत राहायचे आहे. निंदाकाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करणे हाच एकमेव पर्याय आहे. तुकोबाराय हे संताजी महाराजांना पटवून सांगतात, हेच खऱ्या अर्थाने गुरु शिक्षकाचे नाते होय.
संतांची पूजा करणे म्हणजेच साक्षात ईश्वराची पूजा करण्यासारखे आहे असेही शेवटी ह.भ.प.विजय गवळी महाराज म्हणाले. या वेळी कीर्तनाला मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती होती.