२३ वर्षांनी पुरस्काराची स्वप्नपूर्ती लालबाग- परळ भागात कामगार गिरणगांव भागात माझा जन्म झाला. बृहन्मुंबई महानगरपालिका म्युनिसिपल शाळेत दहावीपर्यंत शिक्षण झाले. वडील खटाव मिल भायखळा येथे कामाला होते. त्यामुळे नंतर खटाव मिलमध्ये बॉयलर अटेंडंट कोर्स केला. कोर्स पूर्ण झाल्यावर नवी मुंबई येथे तुर्भे एमआयडीसीमध्ये एक वर्षे कंत्राटी कामगार म्हणून काम केले. सन १९९२ वाशीपर्यंत रेल्वे असतांना बिकट परिस्थितीत वाशीवरून एमआयडीसी पर्यंत पाऊण तास सायकलवर जावे लागत असे. त्यानंतर सायन- मुंबई येथील व्हीव्हीएफ इंडिया मध्ये नोकरीला सन १९९४ मध्ये लागलो. २०१० साली कंपनी तळोजा, पनवेल रायगड येथे शिफ्ट झाली लालबाग ते तळोजा प्रवास चालू झाला.
कामगार क्षेत्रात गिरणगावामध्ये राहत असल्यामुळे तेथील सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्राचा प्रभाव स्थानिकांमुळे पडत होता. त्यातच वडिलांचे मित्र सरदार हॉटेल, काळाचौकी येथील मिल कामगार श्री. रविंद्र तेजम साहेब यांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मिळाल्याचे माहित झाले. त्यांची गुणवंत कामगाराची बनविलेली फाईल पाहता आपणही समाजासाठी, महाराष्ट्रासाठी, देशासाठी चांगले काम करावे, ही प्रेरणा मिळाली. गिरणगांवात सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्य करत होतो. त्यावेळेला बॉम्बे आय. टी. आय. मध्ये शिकत असतांना रक्तदानाची सवय लागली व आजमितीस ७५ पेक्षा जास्त वेळा रक्तदान हे श्रेष्ठदानाचे कार्य माझ्या हातून घडले आहे.
१० वर्षे कंपनीत काम केल्यानंतर सन २००५ साली कामगार कल्याण पुरस्कारासाठी अर्ज केला. मुलाखती दरम्यान माझ्या निदर्शनास आले की, माझ्या सामाजिक कार्याच्या फाईलमध्ये खूपच उणिवा, कमतरता आहेत असे जाणवले बजाज, टाटा, किर्लोस्कर, महिंद्रा अशा इतर कंपनीतील कामगारांच्या फाईल बघितल्या असता, माझ्या उणिवा माझ्या लक्षात आल्या, त्यानंतर मी सन २०१७ पर्यंत कोणताही अर्ज न करता कंपनीमध्ये सजेशन पारितोषिक, जागतिक पर्यावरण दिन पारितोषिक, राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह पारितोषिक, सांस्कृतिक कार्यक्रमातील अॅबॉर्ड घेत राहिलो. कंपनीमध्ये कामगार सोसायटीचा संचालक म्हणून ५ वर्षे क्रियाशील काम केले तसेच कंपनी कामगार युनियनचा सहसचिव म्हणून सुध्दा ५ वर्षे काम केले. कामगारांच्या आर्थिक, सामाजिक व कंपनीतील अडचणी सोडवण्यात सहभागी होत असे. कंपनीमध्ये एच. आर. अधिकारी, डिपार्टमेंट हेड, वरिष्ठ अधिकारी तसेच युनियन व सहकारी यांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभत असे.
कंपनीमध्ये, समाजामध्ये व परिसरात महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगारांविषयी व त्यांच्या पाल्य व कुटुंबाविषयी विविध योजना राबवित राहीलो. कंपनीमध्ये २० पेक्षा जास्त गंभीर आजार योजनेद्वारे २५,०००/- रुपये प्रत्येक कामगार व त्यांच्या कुटुंबियांना मिळाले. तसेच विद्यार्थी शिष्यवृत्तीद्वारे रुपये २,०००/- पासून ५,०००/- पर्यंत अंदाजे ३०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवून दिली. परदेशात शिक्षणासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०,०००/- प्रमाणे रुपये १,५०,०००/- मिळवून दिले. एमएस-सीआयटी पाठ्यपुस्तक योजना माध्यमातून अर्थसहाय्य मिळवून देण्यास सहकार्य केले. गिरणगावातील महिलांना, विद्यार्थ्यांना महानगरपालिका, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून घरघंटी, पाठ्यपुस्तक योजना, एमपीएससी, यूपीएससी, डॉक्टर, अॅडव्होकेट, पी.एचडी या संदर्भात विविध संस्था करीत असलेली मार्गदर्शन सहकार्य व त्यांची इतंभूत माहिती विविध व सोशल मिडीयाच्या माध्यमातून गरजवंतांना कार्यक्रम घेऊन मान्यवरांतर्फे शासनाच्या विविध आर्थिक योजनांच्या लाभाची माहिती सर्वांना देत असे.
के.ई.एम., वाडिया, सर जे.जे., टाटा, नायर हॉस्पिटल परिसराजवळ राहत असल्यामुळे रुग्णांची सेवा करण्याचे भाग्य मिळत होते. तसेच शाळेतील एका विद्यार्थ्यांला कृत्रिम पाय महालक्ष्मी येथील संस्थेमार्फत बसविण्यासाठी सहकार्य केले. शाळेतील विद्यार्थ्यांना व शाळेला विविध वस्तूंचा पुरवठा बृहन्मुंबई म्युनिसिपल शाळा माजी विद्यार्थी संघ, खजिनदार या नात्याने करण्याचे भाग्य लाभले. पांडुरंग पालखी सोहळा वारकरी पदयात्रेमध्ये चहा- पाणी, अल्पोपहार सह स्वागत करण्याचे कार्य विठ्ठल कृपेने माझ्या हातून मागील १० वर्षापासून होत आहे. समाजातर्फे हिंदू नववर्षे शोभायात्रेमध्ये रथयात्रेद्वारे विविध सामाजिक संदेश चलत चित्राद्वारे प्रबोधन करण्याच्या कार्यात माझा मोठा सहभाग असे.
समाजामध्ये सन १९९४ पासून काम करत असतांना विविध उपक्रम, विद्यार्थी गुणगौरव समारंभ व वधु-वर पालक परिचय मेळावा, मोफत विवाह सोहळा, विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना तसेच पांडूरंग पालखी वारकारी स्वागत सोहळा तसेच गिरणगाव सांस्कृतिक हिंदू नववर्ष शोभायात्रा समिती भव्य स्वागत सोहळा, मुंबई ते शनिशिंगणापूर पालखी स्वागत सोहळा, सोहळ्यामध्ये मुख्य सचिव, संयोजक, आयोजक या भूमिकेतून हिरीरीने भाग घेत होतो. त्यामुळे समाजाने तसेच संस्थांनी "लोकनेता व संत संताजी जगनाडे महाराज समता पुरस्कार" देऊन गौरविले तसेच गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठानने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सन २०१७ साली फिनिक्स पक्ष्याप्रमाणे परत नव्या उमेदिने गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारासाठी अर्ज केला. मंत्रालयातील सचिव वर्गाच्या प्रतिनिधींनी व कामगार कल्याण आयुक्त यांच्या मुलाखतीत पास होऊन मला महाराष्ट्र कल्याण मंडळाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार २०१७ हा पुरस्कार कामगार मंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील, इतर मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. २३ वर्षांनी पुरस्काराची स्वप्नीपूर्तीचा आनंद गगनात मावेनासा झाला.
सामाजिक कार्य सतत चालू असल्यामुळे सन २०२३ २०२४ सालाकरीता राष्ट्रीय मिल मजदूर संघ, मुंबई यांच्यातर्फे "कामगार महर्षी स्व.गं. द. आंबेकर गौरव पुरस्कार" सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनिय कामाबद्दल दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी माजी मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण साहेब यांच्या हस्ते इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मिळाला. नोकरी करत असतांना सर्व अडी-अडचणींवर काम करत सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक कार्य करत असल्यामुळे कामगार क्षेत्रातील दोन मानाचे पुरस्कार मला मिळाले. कोणत्याही परिस्थितीत न खचता कामगारांनी सामाजिक कार्य केल्यास निश्चितच शासन व समाजाकडून सन्मान गौरव मिळतो व भावी सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरतो. आपणाकडूनही सामाजिक कार्य घडावे म्हणून हा लेख प्रपंच लिहित आहे.
धन्यवाद !
श्री. दिलीप ताराबाई गणपत खोंड
(विशेष कार्यकारी अधिकारी) (गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार, गं. द. आंबेकर श्रम गौरव पुरस्कार, संत संताजी जगनाडे महाराज समता पुरस्कार, लोकनेता ओबीसी फाऊंडेशन)