लेखक - श्री. संजय नलावडे
आठ-दहा वर्षे भारतीय शास्त्रीय गायनाचे धडे गिरवल्यानंतर कदाचित एका महान गायकाचा उदय झाला असता. परंतु वडिलोपार्जित व्यवसाय बंद पडल्याने पन्नास एक कुटुंबाच्यासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला. संगीताची वाट अर्ध्यावर सोडून एक चौदा पंधरा वर्षांचा तरूण पुन्हा थिएटरकडे वळला आणि पुढे अनेक वर्षे तमाशा क्षेत्राचा, कलावंतांचा 'आधारवड' झाला. तमाशा कलेचा चालता बोलता इतिहास म्हणून स्वत:ची ओळख निर्माण करणारा हा तरूण म्हणजे लालबाग, मुंबई येथील हनुमान थिएटरचे मालक श्री. मधुकरशेठ नेराळे होय. आधीची गंमत - कालचा तमाशा - आताचं लोकनाट्य या स्थित्य॔तराचा, तमाशाचा सुवर्णकाळ अनुभवलेला जुन्या पिढीतील एक महत्त्वाचा साक्षीदार म्हणजे 'श्री. मधुकर नेराळे' होय.
मधुकर नेराळे यांचा जन्म ९ जून १९४३ रोजी जुन्नर येथे झाला. मूळचे ओतूर येथील हे कर्डिले कुटुंब खूप अगोदर जुन्नरला रहायला गेले होते. आजोबांचे कर्जतजवळ नेरळ येथे तेलाच्या व्यवसायानिमित्त दीर्घकाळ वास्तव्य असल्याने 'नेराळे' हे आडनाव पडले असे मधुकर नेराळे सांगतात. वडिल पांडुरंग आणि आई अंजनाबाई या दाम्पत्याने १९४५ साली मुंबईला आल्यावर लालबाग येथे भाजी व्यवसाय सुरू केला. जुन्नरच्या वातावरणात वाढले असल्याने वडिलांना तमाशा कलेची ओढ होती. त्यांनी लालबाग येथील मुख्य रस्त्याच्या मागील बाजूस असलेली झाडाझुडपांची जागा भाड्याने घेऊन साफसफाई केली. बहुसंख्येने गिरणी कामगार असलेल्या या भागात १९४९ मध्ये 'कणात' लावून तिकिटावर तमाशाचा खेळ सुरू केला आणि 'हनुमान थिएटर' अस्तित्वात आले. पुढील पंचेचाळीस वर्षे इतिहास घडला. तमाशाचे मुंबईतील 'प्रमुख केंद्र' आणि तमाशा कलावंतासाठी हनुमान थिएटर एक 'आधार केंद्र' बनले.
मराठी शालेय शिक्षण सुरू असतानाच वडिल पांडुरंग यांनी मधुकरला शास्त्रीय गायन शिकण्यासाठी पं. राजारामजी शुक्ला यांचे मार्गदर्शनाची व्यवस्था केली होती. परंतु अल्पवयातच १९५८ साली पितृछत्र हरपले, भरभराटीला असलेल्या थिएटर व्यवसायात बाहेरील मंडळींची दादागिरी सुरू झाली. कलावंताना वेळेवर पैसे मिळेनात, उपासमारीची वेळ आली. माधवराव नगरकर, तुकाराम खेडकर, पांडुरंग मुळे, दत्ता महाडिक इ. अनेक कलावंतांच्या अंगाखांद्यावर खेळलेल्या मधुकरला ही दैन्यावस्था पाहवली नाही. सात वर्षांची गायन तपस्या भंग झाली. उद्याचा होऊ घातलेला महान भारतीय शास्त्रीय गायक या वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नाला तिलांजली देऊन उद्ध्वस्त होऊ लागलेल्या पन्नास - साठ कुटुंबाचे संसार पुन्हा उभे करणे पोरवयातील मधुकरला जास्त योग्य वाटले. सातवी पास झाल्यानंतर शाळा सुटली पण थिएटरचा कारभार हळूहळू सुरळीतपणे सुरू झाला. अनेक दिग्गज हरहुन्नरी कलावंताचा सहवास मधुकरला लहान वयातच लाभला. तमाशातील बारकावे, कलावंतांचे स्वभाव, व्यवहार चातुर्य, रंगेल प्रेक्षकांचा धूडगूस या नियमित बाबींना तोंड देत 'मधुकरशेठ नेराळे' नावाचं एक बहुआयामी, चतुरस्त्र व्यक्तिमत्व घडत गेलं.
दिवस रात्र फक्त तमाशा आणि कलावंत यांच्या सहवासात राहिल्याने प्रत्येक कलावंत त्यांना पाहता क्षणी वाचता येऊ लागला. खेडोपाड्यातून आलेल्या अनेक गरीब कलावंतांच्या समस्या त्यांना स्वत:च्या वाटू लागल्या. तमाशाच्या प्रत्येक अंगाचा अभ्यास झाला. अनेक लावण्या, शाहिरी कवणं, पाठांतर झाली. लोककला, लोककलावंत, लोकसाहित्य, शाहिर पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास झाल्यामुळे मधुकर नेराळे यांच्या व्यक्तीमत्वाला आधिकच झळाळी प्राप्त झाली. गिरणगावातील दिग्गज काँग्रेस नेते समाज कल्याणमंत्री स्व. दादासाहेब रूपवते यांचा दीर्घकाळ सहवास व भरभक्कम आधार मधुकर नेराळे यांना लाभल्याने कलावंतांच्या समस्या शासन दरबारी मांडण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. फड मालकांचे आपपसातील वाद हनुमान थिएटरमध्ये बैठका होऊन मनोमीलन होऊ लागले. मधुकर नेराळे यांचे मध्यस्थीने दोन दिग्गज कलाकार एकत्र येऊन नवीन समीकरणं अस्तित्वात येऊ लागली.
'जसराज थिएटर' या स्वत:च्या नाट्यसंस्थेमार्फत १९६९ साली प्रथमच व्यावसायीक रंगभूमीवर आणलेले 'दादू इंदुरीकर यांचा सावळ्या कुंभार आणि प्रभा शिवनेरकरची गंगी' साकारलेले 'गाढवाचं लग्न' प्रयोगाने विक्रमी यश संपादले. गाढवाचं लग्न, आतुन किर्तन वरून तमाशा, राजकारण गेलं चुलीत, उदं गं अंबे उदं, एक नार चार बेजार, पुनवेची रात्र व काजळी जसराजच्या या नाटकांनीही तुफान यश मिळवले. १९७८ मध्ये 'तमाशा कला व कलावंत विकास मंदिर' ही कलावंताचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य पातळीवरील संस्था स्थापन करण्यात पुढाकार घेतला, तमाशा कलावंतासाठी अनेक सवलती मिळवल्या. तमाशा कलावंताना बारमाही पगार मिळावा म्हणून योजना आणण्यासाठी प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले.
लोककलेची उत्तम जाण आणि अभ्यास असल्याने शासनाच्या अनेक सांस्कृतिक समित्यांवर काम करण्याची संधी मधुकर नेराळे यांना मिळाली. मुंबई दुरदर्शनवर सहा वर्षे चित्रपट पूर्वपरिक्षण समिती सदस्य, मुंबई आकाशवाणीवर कार्यक्रम सल्लागार समिती सदस्य, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेवर आकरा वर्ष कार्यकारिणी सदस्य, जपान महोत्सवात मधुकर नेराळे यांचे नेतृत्वाखाली पाठवलेल्या लावणी संचाची दैदिप्यमान कामगिरी, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभागातर्फे कलावंत पुरस्कार निवड समिती सदस्य, अखिल भारतीय मराठी शाहिर परिषद ही शाहिरांची संघटना स्थापन करून शाहिरी कलेचे प्रश्न सोडविण्याचे कार्य महाराष्ट्रतील मान्यवर शाहिरांच्या सहकार्याने उत्तम प्रकारे केले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुक - १९८५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांनी प्रचारासाठी शंभर कलापथकांचं नेतृत्व श्री. मधुकर नेराळे यांच्यावर सोपवलं. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याने तमाशा प्रशिक्षण संचालक म्हणून सातारा, लातूर, सांगली, जुन्नर, नाशिक येथे १९९०-९६ कालावधीत शिबीरे आयोजित करून मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपवली. या पाच शिबीरांमधून ७५ मुली, ७५ मुले असे एकूण १५० प्रशिक्षणार्थी उत्तमरित्या तयार केले.
मुंबईत तमाशाला उत्तम प्रतिसाद होता, १९ तमाशा थिएटर होती. पण हळूहळू तमाशा बदलत गेला आणि एकेक करून सर्व थिएटर बंद झाली. सर्वात शेवटी १९९५ मध्ये हनुमान थिएटर बंद झाले. या कलेच्या पवित्र मंदिरात अनेकजण घडले, अनेक कुटुंब उभी राहिली, अनेकांची आयुष्य स्थिरस्थावर झाली. अनेक कलावंताची कारकिर्द एवढी बहरली की आजही तमाशा रसिक विसरले नाहीत. गुलाब संगमनेरकर ही पूर्णपणे उध्वस्त झालेली कलावंत पण मधुकर नेराळे आणि हनुमान थिएटरने तिला पुन्हा उभी केली आणि तिने स्वत:चा फड काढला. सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री मधु कांबीकर यांना मराठी चित्रपट घट्ट पाय होवून उभे करण्यात मधुकर नेराळे यांचे मोठे योगदान आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक तमाशा कलावंताची खूबी मधुकर नेराळे यांना माहित होती. मुंबईत असूनही जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावागावातील कलावंत, गावे, रस्ते यांची खडान् खडा माहिती मधुकर नेराळे आजही सांगतात.
आज वयाच्या ७८ व्या वर्षी तब्बेत ठिक नसतानाही तमाशा कलेबद्दलची आत्मियता तसूभरही कमी झालेली नाही. मी जेंव्हा मधुकर नेराळे (बाबा) यांना भेटण्यासाठी गेलो तेंव्हा त्यांच्या बोलण्यातून त्यांना झालेला आनंद ओसंडून वाहताना दिसला. आजच्या तमाशा रसिकांना आणि कलावतांनाही माहित नसलेले अनेक किस्से, संदर्भ उलगडून सांगताना बाबांनी गप्पांची मैफल अशी काही रंगवली की दोन - अडीच तास मी तमाशाचा सुवर्णकाळ अनुभवला. उदाहरणार्थ...लोककला, म्हणजे काय? लावणीचे प्रकार - खरी लावणी, जुंदरी लावणी, पंढरपुरची लावणी, बैठकीची लावणी, ढोलकीच्या फडाची लावणी आणि संगीत बारीची लावणी यातील वेगळेपण काय आहे? बतावणीची लावणी म्हणजे काय? हे समजावून सांगताना हरीभाऊ वडगावकरांनी लिहीलेली आणि दादू इंदुरीकर यांनी सादर केलेली अर्धा तासाची बतावणीची लावणी सांगितली. बैठकीची लावणी हा मराठी लोककलेतील अतिशय गोंडस प्रकार असल्याचं सांगितले. सत्यभामाबाई पंढरपूरकर या कधीही रंगमंचावर नाचल्या नाहीत, आयुष्यभर त्यांनी दिवाणखाना केला पण रसिकांना खिळवून ठेवण्याची कला त्यांना अवगत होती. सोने १६ रू. तोळा असताना सत्यभामाबाईंना ५०० रू. मानधन मिळत असे.
एकदा बालगंधर्व भाऊ फक्कड यांचा तमाशा पहायला गेले होते, त्यानंतर बालगंधर्व यांनी दोन पेट्या रंगीत कपडे भाऊ फक्कड यांना भेट म्हणून पाठवली आणि तमाशात रंगीत कपड्यांना सुरूवात झाली. शाहीर पठ्ठे बापूराव यांचेवर समाजाने गुन्हा दाखल केला तेंव्हा शाहीरांनी 'साहित्य आणि कला' ही कोणा एका समाजाची मक्तेदारी नाही असे ठणकावून सांगितले. एकदा भाऊ फक्कड शाहू महाराजांची भूमिका करत असताना दस्तुरखुद्द शाहू महाराज उपस्थित झाले. सर्वांनी मुजरा केला पण भाऊ फक्कडांनी मात्र दुर्लक्ष केल्याने अनेकांच्या भुवया वर गेल्या. परंतु तमाशा संपल्यावर भाऊंनी,'मी राजा होतो म्हणून मुजरा केला नाही, असे सांगून माफी मागितली, नंतर शाहू महाराजांनी भाऊ फक्कड यांना आपल्या पदरी ठेवले. तमाशाला स्त्री कलावंताची गरज का वाटली? तमाशात घुंगरू केंव्हा आले? वगनाट्य हा प्रकार केंव्हा सुरू झाला? बतावणीचे संवादात्मक, काव्यात्मक आणि विनोदात्मक असे प्रकार, श्रमजीवी तमाशा आणि बुद्धीजीवी तमाशा, स्त्री कलावंतांचा करूण आणि भयानक अंत, आजची तमाशाची अर्थव्यवस्था अशा अनेक विषयांवर बाबा भरभरून बोलले. आजच्या कलावंतांनी साहित्यिक मूल्यांचा अभ्यास केला पाहिजे नाहीतर तमाशाचा आत्मा हरवून जाईल असा संदेशही दिला आहे.
वयाच्या सहाव्या वर्षापासून तमाशा क्षेत्रातील गरीब, मागासवर्गीय कलावंतांच्या अंगाखांद्यावर वयाने व कामाने मोठा होण्याचे भाग्य मला लाभले असे बाबा अभिमानाने सांगतात. मधुकर नेराळे यांच्या कार्याची पोचपावती म्हणजे त्यांना मिळालेले तीन-चारशे पुरस्कार होय. राज्य शासनाचा 'लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर' पुरस्कार, प्राचार्य डाॅ. पी.बी.पाटील सोशल फोरम शांती निकेतन, सांगली यांचा 'कर्मयोगी' पुरस्कार, मुंबई, पुणेसह अनेक प्रमुख महानगरपालिकांनी पुरस्कारांनी गौरविले आहे. अशा या बहुआयामी, चतुरस्त्र कला तपस्वीला दीर्घायुष्य लाभो! हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!
विशेष सूचना :- कोणत्याही लेखावर मूळ लेखकाचे नाव डिलीट करून आपले नाव टाकणे हा कायदेशीर सायबर गुन्हा आहे, याची नोंद घेणे.
लेखक - श्री. संजय नलावडे
धोलवड, मुंबई, मोबाईल - ८४५१९८०९०२
"निसर्गरम्य जुन्नर - भूमी गुणीजनांची"