साखरखेर्डा : संत तुकाराम महाराज यांची अभंग गाथा इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात आली. त्यावेळी पुन्हा अभंग गाथा जिवंत करण्याचे काम संताजी जगनाडे महाराज यांनी केले. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे विचार कोणीही नष्ट करू शकत नाही. हा संदेश संताजी जगनाडे महाराज यांनी समाजाला दिला. म्हणून आज गाथा तुमच्या आमच्या समोर आहे. ही केवळ गाथा नसून जीवन चारित्र्याचा मागोवा आहे. जो ते श्रवन करेल त्याचे जीवनाचे सार्थक होईल, असे प्रबोधन हभप राजन महाराज काशीद यांनी दि. ७ डिसेंबर रोजी संत तुकाराम महाराज आणि संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चारित्र्याचा उलगडा करताना केले.
वरोडी येथे परमहंस श्री तेजस्वी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्याचा सहावा दिवशी संत तुकाराम महाराज आणि संत संताजी जगनाडे महाराज यांच्या मधील संबंधांचा आढावा त्यांनी मांडला.
ते पुढे म्हणाले की, संत तुकाराम महाराज हे साक्षात्कारी व निर्भीड संत कवी होते. 'अभंग म्हटला की तो फक्त तुकारामाचाच' एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. भागवत धर्माचा कळस होण्याचे महद्भाग्य त्यांना लाभले. महाराजांची गाथा ही अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखांमध्ये कायम आहे. गाथा बुडविली म्हणणाऱ्यांना जनसामान्यांच्या तोंडून मुखोद्गत अभंग ऐकून गाथा जिवंत असल्याचा प्रत्यक्ष अनुभव झाला. इंद्रायणी नदीच्या काठावर लाखोंचा जनसमुदाय गाथेतील अभंग संत संताजी जगनाडे महाराज म्हणू लागले यावेळी तुकाराम महाराजांना जाणीव झाली की आपले अभंग, आपली गाथा बुडालेली नाही. तर ती जनसामान्यांच्या मुखांमध्ये अखंड जिवंत आहे. आपल्या कार्याची ही खरी यथोचित पावती आहे. समाजमनावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करून लोकांना नवा धर्म, नवी भाषा देण्याचं काम संत तुकारामांनी केले. संत तुकारामांचे धर्मक्रांतीचे समाज प्रबोधन आज, अभंग समाजाला मार्गदर्शक ठरलेले आहे. अर्थाने संत तुकाराम आणि संत संताजी जगनाडे महाराज हे आठव्या पिढीतील नायक होते.