लेखक - डॉ. सुनील भंडगे
संतश्री संताजी जगनाडे महाराज यांचा जन्म दि. ८ डिसेंबर, १६२४ रोजी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात असलेल्या सुदुंबरे या गावी झाला. त्यांची आई माथाबाई आणि वडील विठोबा हे पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. त्यामुळे साहजिकच संताजींवर लहानपणापासूणच धार्मिक संस्कार झाले होते. घरातील धार्मिक वातावरणामुळे बालपणापासूनच त्यांना कीर्तनाला, भजनाला जाण्याची आपसूकच सवय जडली. त्यामुळेच नंतर ते अतिशय सहजतेने जगद्गुरू संत तुकाराम यांच्या १४ टाळकत्यांपैकी एक झाले.
घरचा पारंपरिक व्यवसाय तेल गाळण्याचा असल्यामुळे ते व्यवसायात लक्ष घालू लागले. वयाच्या १२व्या वर्षीच त्यांचा विवाह बंधनात अडकून त्यांचे दोनाचे चार हात यमुनाबाई यांच्याशी झाले. सुखाचा संसार करत करतच, ते वेळ मिळेल, तेव्हा भजन कीर्तनाला जात. तिथल्या वातावरणातून त्यांचे लक्ष धार्मिकतेबरोबरच सामाजिक कार्याकडेही वळू लागले. त्यावेळी आपल्या आशयसंपन्न आणि सरळ-सुबोध अशा अभंगांमुळे संत तुकाराम महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. असेच एकदा देहू जवळच्या सुदुंबरे गावी संत तुकाराम कीर्तनासाठी आले होते. त्यांचे कीर्तन ऐकून संताजींवर त्यांचा खूपच मोठा प्रभाव पडला, इतका की संताजींनी घर-संसार सोडण्याचा निर्णय घेतला. परंतु, 'तुम्हाला संसारात राहूनही आपला माणूसपणाचा धर्म जपत, परमार्थ साधता येतो,' असे संत तुकारामांनी समजावणीच्या सुरात त्यांना सांगितले, ते संताजींना पटलेही.
तेव्हापासून ते संत तुकारामांच्या टाळकऱ्यांमध्ये सामील झाले कायमचेच. त्यांच्या सान्निध्यात राहूनच त्यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून घेण्यास सुरुवात केली.
समाजमनावर होत असलेला, संत तुकारामांचा प्रभाव हा काही निर्बुद्ध धर्ममार्तंडांना सहन होत नव्हता. त्याकाळी निर्बुद्ध मंडळींनी संत तुकारामांनी आजवर लिहिलेल्या अभंगांची गाथा आळंदीतील इंद्रायणी नदीत बुडविण्याचा निश्चय केला आणि एके दिवशी त्या नदीच्या पाण्यात नष्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बुडवल्याही. परंतु विशेष म्हणजे तुकाराम महाराजांचे सर्व अभंग है संताजी महाराजांना मुखोद्गत, तोंडपाठ होते. सुंदर हस्ताक्षरांचे धनी असलेल्या १३ दिवस उपाशी राहून संताजींनी सर्व अभंग पुन्हा लिहून काढले. संत तुकाराम महाराज आणि संताजी जगनाडे महाराज हे अगदी जीवश्चकंठश्च अशा गुरू-शिष्य परंपरेतील संत होते. त्यामुळे त्यांनी तुकाराम महाराजांना कधीही एकटे सोडले नाही, असे महान होते संताजी जगनाडे महाराज. तुकारामांच्या साहचर्याने त्यांनीही काही अभंग लिहिले आहेत. ते म्हणतात की,
मजशी ते ब्रह्मज्ञान काही नाही,
आपल्या कृपेने होईल सर्वकाही
होईल मज आणि माझिया कुळांशी,
पांडुरंग मुळाशी सर्व आहे
संतु म्हणे ब्रह्म ब्रह्म सर्व जाणे,
आपुले ते मन सुधारले
संताजी महाराज किती साध्या आणि सरळ मनाचे होते ते यातून प्रतीत होते. त्यांच्या वागल्या-बोलण्यात कोणताही गंड नाही, आविर्भाव नाही. ब्रह्मज्ञान मला माहीत नाही, ते कोणी जाणोत अथवा न जाणोत; पण माझे सर्व कुळ त्या विठुरायाच्या पांडुरंगाच्या मुळाशी जोडले गेले आहे. म्हणूनच माझे मन सुधारले आहे, अशी मोकळी कबुली संताजी महाराज देतात, तेव्हा त्यांची विनयशील समर्पण भाव आपल्याला मोहवून टाकतो.
संताजी आपल्या जीवन व्यवहारातील सत्य सांगताना म्हणतात की,
सगुण हा घाणा घेऊनि बैसलो,
तेली जन्मा आलो घाणा घ्यावा,
नाही तर तुमची आमची एक जात,
कमी नाही त्यात अणुरेणू
संतु म्हणे जाती दोनच त्या आहे,
स्त्री आणि पुरुष शोधुनिया पाहे !
"मी जन्माने तेली असलो आणि त्यामुळे मला सगुण असा घाणा मिळाला असला, तरीही माझी आणि तुमची जात एकच आहे त्यात अणु-रेणू इतकेही अंतर नाही. खरं तर माणसाच्या दोनच जाती आहेत, त्या म्हणजे स्त्री आणि पुरूष. इतर कोणत्याही जाती नाहीत. त्याचा बारकाईने शोध घेण्याची गरज आहे, " असे संत संताजी महाराज आपल्याला सूचवतात.
अशा संताजी जगनाडे महाराजांचे वयाच्या ७६व्या वर्षी मार्गशीर्ष वद्य १३ १६८८ला त्यांचे निधन झाले. त्यांना विनम्र अभिवादन.
डॉ. सुनील भंडगे, - अध्यासन प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन, पुणे (९९६०५००८२७)