दाबली धांदरणे: येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी, धुळेच्या वतीने विद्यार्थिनींना पी.टी. ड्रेस वाटप करण्यात आले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी हा सामाजिक उपक्रम हाती घेण्यात आला. या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून विभागीय कार्याध्यक्ष सौ. वैशाली नरेंद्र चौधरी, जिल्हा अध्यक्षा सौ. छाया कल्याण करनकाळ, उपजिल्हाध्यक्ष सौ. मनीषा चौधरी, जिल्हा कार्याध्यक्ष सौ. शोभा किशोर थोरात, तसेच सौ. दिपाली तुषार चौधरी, सौ. प्रियंका कल्पेश चौधरी, सौ. सुवर्णा नितीन चौधरी, सौ. अलका नटराज चौधरी, सौ. गीता मुकेश थोरात आणि सौ. कावेरी आनंद करनकाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेकडून सर्व मान्यवरांचे यथोचित सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमास चांदणे गावचे सरपंच जितेंद्र गिरासे, माजी सरपंच राजेंद्र पाटील, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप गिरासे, सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. लोकसहभागातून शाळेचा विकास या अभियानांतर्गत शाळेचे माजी विद्यार्थी, सहाय्यक उपनिरीक्षक योगेश राजेंद्र पाटील यांनी दहा हजार रुपयांची मदत शाळेसाठी दिली.
विद्यार्थिनींना पी.टी. ड्रेस मिळाल्याने त्या आणि पालक वर्ग खूप आनंदी झाले. विद्यार्थीनींनी शाळेच्या मैदानावर "महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडी, धुळे" अशी रांगोळी काढून आगळ्या-वेगळ्या पद्धतीने स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात सौ. छाया कल्याण करनकाळ यांनी सांगितले की, समाजासाठी काहीतरी देणे लागतो, याच भावनेतून विद्यार्थिनींसाठी हा उपक्रम राबविला. जिल्हा उपाध्यक्ष सौ. मनीषा चौधरी यांनी योगासनांचे महत्त्व सांगत, मी स्वतः येथे येऊन योगा शिकवणार असल्याचे जाहीर केले. तर धुळे शहर सचिव सौ. सुवर्णा चौधरी यांनी विद्यार्थिनींना सुंदर अक्षरलेखनाचे धडे देण्याचे आश्वासन दिले.
शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना पवार आणि उपशिक्षिका वैशाली चव्हाण यांनी महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत सांगितले की, ४० कि.मी. अंतरावरून ग्रामीण भागात येऊन पदरमोड करून पी.टी. ड्रेस वाटप करणे ही समाजसेवेची उत्तम भावना आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कैलास वाघ यांनी केले तर आभार स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष गजानन पाटील यांनी मानले. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महिला आघाडी, धुळेच्या या समाजोपयोगी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.