सिंदेवाही, ता. २६: नागपूर येथील संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतराच्या प्रस्तावाला विदर्भ तेली समाज महासंघाच्या सिंदेवाही-लोनवाही शाखेने कडाडून विरोध दर्शवला आहे. महासंघाने सरकारला ठाम इशारा दिला आहे की, हा निर्णय त्वरित मागे घेतला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
नागपूरच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाने १८ मार्च २०२५ रोजी संस्थेच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र, विदर्भ तेली समाज महासंघाने हा प्रस्ताव समाजाच्या अस्मितेचा अपमान असल्याचे सांगून त्याला तीव्र विरोध दर्शवला आहे.
संत जगनाडे महाराज हे सामाजिक समरसतेचे प्रतीक असून, त्यांनी समाजाला समानतेचा संदेश दिला. त्यांच्या नावाने स्थापन झालेल्या संस्थेचे नामांतर करणे हा समाजाच्या अस्मितेवर आघात असल्याचे महासंघाचे मत आहे. त्यामुळे संस्थेचे मूळ नाव कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, विद्यमान आमदार आणि संबंधित प्रशासनास महासंघाने निवेदन सादर केले आहे. सरकारने हा निर्णय मागे न घेतल्यास यापुढील काळात मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
निवेदन देताना महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष रघुनाथ शेंडे, माधव वरभे, तालुकाध्यक्ष विनायक घुगुसकर, सचिव अरविंद देवतळे, किशोर भरडकर, मोरेश्वर कोलते, योगराज कावळे, अल्का कावळे हे पदाधिकारी उपस्थित होते.
हा प्रस्ताव तातडीने मागे घ्यावा, अन्यथा सरकारला मोठ्या प्रमाणावर आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा ठाम इशारा महासंघाने दिला आहे.