वर्धा: देश मंगळावर अंतराळ स्थानक आणि महासत्ता बनण्याचे स्वप्न दाखवतो, पण दुसरीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाणलेली अस्पृश्यता आजही कायम आहे, अशी धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना राम नवमीच्या दिवशी घडली आणि ती भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्यासोबत घडली, ज्यामुळे सर्वत्र संतापाचे लाट उसळल्या आहेत. विशेषतः ओबीसी समाजात या घटनेमुळे प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
देवळीतील प्राचीन राम मंदिरात आज राम नवमीचा उत्सव जोमात सुरू होता. रामदास तडस, त्यांच्या पत्नी शोभा तडस आणि काही भाजप पदाधिकारी दर्शनासाठी पोहोचले. पूजा सुरू असताना तडस गर्भगृहात मूर्तीची पूजा करण्यासाठी गेले, पण पुजाऱ्याने त्यांना थांबवले. "तुम्ही मूर्तीची पूजा करू शकत नाही, लांब राहा," असे पुजाऱ्याने सांगितले. हे ऐकून तडस अवाक झाले आणि त्यांनी विचारले, "मी आत का जाऊ शकत नाही?"
पुजारी म्हणाले, "तुमच्याकडे सोवळे (पवित्र धोतर) किंवा जानवे नाही, नेहमीच्या कपड्यांत दर्शन शक्य नाही. बाहेर जा." हे ऐकून तडसांना धक्का बसला. वाद टाळण्यासाठी ते माघारी फिरले आणि कठड्याबाहेर उभे राहून दर्शन घेतले. हातात पूजेचे ताट होते, पण मूर्तीवर फुले वाहता आली नाहीत. या घटनेमुळे त्यांना खूप वाईट वाटले, असे तडस म्हणाले. "मी आणि गावकऱ्यांनी या मंदिराच्या सुधारणेसाठी नेहमी मदत केली. पुजारी कुटुंब पिढीजात आहे, पण ते फक्त राम नवमीस येतात. मी त्यांना विचारले, तुम्ही एक दिवस आला आणि नियम लावता? पण वाद टाळून मी शांत राहिलो," असे त्यांनी सांगितले.
या घटनेने गावात तणाव निर्माण झाला. काहींना आठवले की कधीकाळी या मंदिरात हरिजनांना प्रवेश नव्हता, ज्यावेळी महात्मा गांधींनी सर्वांसाठी ते उघडले होते. आज माजी खासदारालाही प्रवेश नाकारल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.
ही घटना समजताच ओबीसी समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे, विशेषतः रामदास तडस हे तेली समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेते असल्याने. महाराष्ट्रातील प्रमुख ओबीसी संघटनांनी या अन्यायाचा निषेध नोंदवला आहे. ओबीसी सेवा संघ, ओबीसी महासंघ, समता परिषदे, महाराष्ट्र ओबीसी संघर्ष मोर्चा, महाराष्ट्र राज्य ओबीसी महासंघ, राष्ट्रीय ओबीसी महासंघ, ओबीसी एकता मंच – महाराष्ट्र, ओबीसी युवक-युवती संघटना, महाराष्ट्र, आणि ओबीसी समाज संघटना, नागपूर/विदर्भ विभाग यांनी एकत्र येऊन या घटनेच्या निषेधाचे निवेदन दिले आहे. पुणे तेली समाजाचे माजी अध्यक्ष श्री. प्रकाश कर्डीले यांनीही या अन्यायाला तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, phuleshahuambedkars.com आणि teliindia.in च्या वतीने अभिजित देशमाने यांनीही या घटनेला विरोध दर्शवला असून, तेली समाजाच्या सन्मानाला ठेच पोहोचल्याचा आरोप केला आहे. ओबीसी समाजाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत आंदोलनाचा इशारा दिला आहे.