देवळी : श्रीराम नवमीच्या दिवशी भाजपचे माजी खासदार रामदास तडस आणि त्यांची पत्नी, माजी नगराध्यक्ष शोभा तडस हे श्रीराम मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र, तिथे विश्वस्त मुकुंद चौरीकर यांनी त्यांना पूजा करण्यापासून रोखले, ज्यामुळे परिसरात मोठा रोष निर्माण झाला आणि निषेधाचे स्वर उमटले. अखेर आज, सोमवारी झालेल्या एका बैठकीत विश्वस्तांनी माफी मागितल्याने या प्रकरणाला पूर्णविराम मिळाला.
या बैठकीचे आयोजन देवळीच्या इनडोअर स्टेडियममध्ये करण्यात आले होते, ज्यामध्ये रामदास तडस, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, शोभा तडस आणि श्रीराम मंदिर देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त उपस्थित होते. बैठकीत उपस्थितांनी देवस्थान प्रशासनावर जोरदार टीका करत, त्यांच्यावर जातीय व्यवस्थेला बळकटी देण्याचा आरोप केला. देवस्थानचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य आणि विश्वस्त मुकुंद चौरीकर यांनी रामदास तडस आणि देवळीच्या नागरिकांची सार्वजनिक माफी मागितली. चौरीकर यांनी आपली भूमिका मंदिराच्या नियमांचा भाग असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले, तरी त्यांची ही बाजू संशयास्पद राहिली. यावेळी सुनील गफाट यांनी असा प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी कठोर इशारा दिला.
बैठकीस गुंडू कावळे, राहुल चोपडा, प्रा. नरेंद्र मदनकर, नंदू वैद्य, रवी कारोटकर, शरद आदमने, शरद नाईक महाराज, शुभांगी कुर्जेकर, सागरकपूर, रवी पोटदुखे, सौरव कड्स, श्याम नाईक, उमेश कामडी, भरत पांडे, हेमंत जावंधिया आणि देवस्थानचे विश्वस्त लक्ष्मीकांत पांडे, वसंतराव जगताप, लक्ष्मीकांत खोंड हेही उपस्थित होते.
आमदार राजेश बकाने यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे निवेदन देऊन श्रीराम मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळाची धर्मदाय आयुक्तामार्फत चौकशी करण्याची आणि मंडळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे. हे मंदिर प्राचीन असून, देवळीकरांचे श्रद्धास्थान आहे, जिथे भाविक भक्तीभावाने पूजा करतात. मात्र, विश्वस्त मंडळाचा गोंधळलेला कारभार भाविकांना त्रास देत आहे. देवस्थानकडे २०० एकर शेती आहे, ज्यापासून मोठी उत्पन्न मिळते, पण त्याची नोंद नाही आणि मंदिराची दुरुस्ती नीट होत नाही, असे त्यांनी आपल्या पत्रकात नमूद केले आहे.