वर्धा : अखिल तेली समाज महासंघ आणि संताजी सृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सेवाग्राम येथे बापू कुटी समोर एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते कृष्णाजी बेले यांनी भूषवले. बैठकीच्या सुरुवातीला सम्राट अशोक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संताजी जगनाडे महाराज आणि डॉ. मेघनाथ साहा यांना अभिवादन करण्यात आले.
या बैठकीत एटीएम (अखिल तेली समाज महासंघ) आणि संताजी सृष्टीच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः व्यवस्थेच्या विरोधात समाज जागृती करणे आणि जनतेला विज्ञानवादी बनवणे हा एकमेव उद्देश असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. बैठकीत माजी खासदार रामदासजी तडस यांना रामनवमीच्या दिवशी राम मंदिरात अपमानित करून दर्शनापासून वंचित ठेवण्याच्या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यातील जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित पुजाऱ्यावर अटक आणि कठोर कारवाईची मागणी करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
याशिवाय, ओबीसींची जातनिहाय जनगणना व्हावी, या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे, अशी भूमिका घेण्यात आली. तसेच, महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावरील चित्रपटातील ऐतिहासिक सत्य अबाधित ठेवून तो प्रदर्शित व्हावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आणि चुकीच्या पद्धतीने अटक झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीला विदर्भातील विविध भागांतून पदाधिकारी आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये ज्ञानेश्वरदादा रक्षक (नागपूर), डॉ. विलास काळे, मदन नागपुरे, प्रा. डॉ. एडवोकेट रमेश पिसे, ज्ञानेश्वर रायमल, विजय डाफळे, कैलास गायधने, अजय कांबळे, सुधीर गिरडे, एडवोकेट अनिल अंबाडकर, डॉ. अभय कुमार बांगडकर, साहेबराव हटवार, शंकरराव भगत, सुनील महिंद्रे, नरेश भागडे, सुरेश वडतकर, भास्करराव देशमुख, गुलाबराव भोळे, वंदना वनकर, शुभांगी घाटोळे, सुनीता काळे, मीरा मदनकर, अजय घंगारे, अनिल जिपकाटे, गौरव पाटील, पुरुषोत्तम कांबळी, प्रफुल गुल्हाने, एकनाथ डहाके, संतोष खोब्रागडे, गजानन गुल्हाने, हरेंद्र खंडाईत, वासुदेवराव गुल्हाने, शरयू वांदिले यांच्यासह अनेकांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक प्रफुल गुल्हाने (वर्धा), प्रा. एडवोकेट रमेश पिसे (नागपूर) आणि ज्ञानेश्वर रायमल (यवतमाळ) यांनी या बैठकीच्या यशस्वी आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. ही बैठक समाज जागृती आणि परिवर्तनाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरली.