दिनांक ११ मे २०२५ रोजी संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा आणि जवाहर विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित ग्रीष्मकालीन संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साहात आणि थाटामाटात संपन्न झाला. या शिबिराच्या उद्घाटन कार्यक्रमाला मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली होती. या सोहळ्याचे अध्यक्ष श्री. विजय हटवार (अध्यक्ष, संताजी ब्रिगेड) यांनी अध्यक्षीय भाषणातून शिबिराच्या उद्देशांवर प्रकाश टाकला, तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. मोहन चौरसिया यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन करताना जीवनातील मूल्यांचे महत्त्व सांगितले. विशेष अतिथी श्री. मोहन वैरागडे यांनी योगाचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आणि त्याचे फायदे याबाबत माहिती दिली. याशिवाय, शुभांगी डांगरे आणि कमलेश भयानि यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, त्यानंतर संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या मूर्तीला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यात आला. शिबिराचे प्रास्ताविक डॉ. दीपा हटवार यांनी करताना शिबिराचे उद्दिष्ट आणि त्यातून मुलांना मिळणाऱ्या संधींबाबत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालनाची जबाबदारी डॉ. रश्मी वानोडे यांनी यशस्वीपणे पार पाडली, तर कविता रेवतकर यांनी सर्वांचे आभार मानले. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी संयोजक अजय धोपटे (संस्थापक सचिव, संताजी ब्रिगेड), शिबिर प्रमुख डॉ. दीपा हटवार, शिबिर सहप्रमुख श्री. सुनिल मानापुरे (अध्यक्ष, युवा आघाडी, नागपूर शहर) यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला श्री. चंदू वैद्य, श्री. राजेश हटवार, श्री. झांडे भाऊ, सौ. प्रणिता वैरागडे, सौ. मोना वैरागडे यांच्यासह अनेक पालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. या शिबिरातून मुलांना सांस्कृतिक मूल्ये, शिक्षण आणि जीवनकौशल्ये शिकण्याची संधी मिळणार असून, हा सोहळा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला.