पिंपरी-चिंचवड: तेली समाजाने हुंडा प्रथा आणि लग्नातील अनिष्ट प्रथांना मुळापासून उच्चाटन करण्याचा ठाम निर्णय घेतला आहे. संताजी सेवा प्रतिष्ठान आणि प्रदेश तेली महासंघाच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर चौकात तेली समाजबांधवांनी एकत्र येऊन हुंडाविरोधी शपथ घेतली. वैष्णवी हगवणे यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या पार्श्वभूमीवर आयोजित या बैठकीत समाजातील बदलाची नांदी झाली. या प्रसंगी समाजबांधवांनी हुंडा प्रथेला विरोध करत साध्या आणि समानतेवर आधारित विवाह पद्धतीचा अवलंब करण्याचा संकल्प केला.
वैष्णवी हगवणे प्रकरणाने तेली समाजाला अंतर्मुख करत सामाजिक सुधारणेची गरज अधोरेखित केली. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरात हुंडा प्रथेच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला. समाजातील महिला आणि मुलींची लक्षणीय उपस्थिती या बदलाच्या लढ्यातील त्यांच्या सक्रिय सहभागाचे द्योतक होती. चापेकर चौकातील क्रांतिवीर चापेकर पुतळ्यासमोर समाजबांधवांनी एकत्र येऊन हुंडा प्रथेच्या विरोधात शपथ घेतली आणि वैष्णवी हगवणे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी उपस्थितांनी समाजातील प्रत्येक व्यक्तीने या प्रथेच्या विरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले.
संताजी सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. सरोज अंबिके यांनी सांगितले की, हुंडा प्रथा ही समाजाच्या प्रगतीला खीळ घालणारी आहे. “आपण सर्वांनी मिळून ही प्रथा बंद करायची आहे. लग्न ही दोन कुटुंबांची जोड आहे, ती पैशाच्या व्यवहाराने कलंकित होऊ नये,” असे त्यांनी ठणकावले. प्रदेश तेली महासंघाचे राजेश डोंगरे यांनी समाजातील तरुणांना साध्या विवाह पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले. “सामाजिक बदलाची सुरुवात आपल्यापासूनच व्हायला हवी,” असे ते म्हणाले.
बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. लग्न सोहळ्यात हुंडा मागणे किंवा देणे पूर्णपणे बंद करणे, हुंड्याची मागणी करणाऱ्या कुटुंबाला नकार देणे, रुखवतामध्ये मुलीकडून महागड्या वस्तूंची अपेक्षा न करणे, आणि लग्न साध्या पद्धतीने करणे यावर जोर देण्यात आला. याशिवाय, मोठ्या आणि खर्चिक विवाहांचे अनुकरण टाळणे, लग्न वेळेत लावणे, अनावश्यक भाषणबाजी आणि सत्कार कमी करणे, तसेच रिटर्न गिफ्टची प्रथा बंद करणे यासारखे ठराव मंजूर करण्यात आले. हुंडा मागणाऱ्या किंवा घेणाऱ्या कुटुंबांना समाजाकडून योग्य समज देण्याचा निर्णयही घेण्यात आला.
या बैठकीला संताजी सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक बाळासाहेब शेलार, सचिव जिजा वंजारी, रोहिदास पडगळ, मनोज अणेकर, नरेंद्र मेहेर, विश्वास डोंगरे, प्रदीप सायकर, राजाराम वंजारी, वैशाली आतकर, डॉ. गणेश अंबिके, मनीषा किर्वे, पी. टी. चौधरी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या एकजुटीने तेली समाजाने सामाजिक सुधारणेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. वैष्णवी हगवणे यांच्या स्मृतीला प्रेरणा मानून हा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार समाजबांधवांनी व्यक्त केला.